महाड येथे झालेल्या पाच मजली निवासी इमारत दुर्घटनेला अठरा तास लोटून गेल्यानंतर याच्या ढिगाऱ्याखालून कोण बचावले असतील की नाही, याबाबत शंका असतानाच दुपारी १.१५ वा महंमद बांगी या सहा वर्षाचा मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची यावेळी प्रचिती आली.

आत्तापर्यंत या ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. सय्यद अमिर समिर (वय ४५) आणि नविद अंतुले (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. तर २५ जणांना या ढिगाऱ्याखालून सोमवारी रात्री उशीरा बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली होती.

निकृष्ट बांधकामाचा नमुना

तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधित बिल्डरकडे करत होते. मात्र, नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोळवण या बिल्डरकडून केली जात होती, अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली. दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्किंगमधील एक खांब ढासळल्याची बाब या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्याने पुन्हा रहिवाशांची समजूत काढली होती. त्यानंतर सुमारे सात तासांतच ही इमारत पूर्णपणे कोसळली.