महाराष्ट्र भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांवर शिक्कामोर्तब केलं. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली.

आणखी वाचा- ग्राम पंचायत निवडणूक, सरपंच ते महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास

“भाजपाची खऱ्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.

“खडसे यांच्याबरोबर बऱ्याचजणांची यायची इच्छा आहे. पण करोनाकाळात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत,” असं सांगत जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला.

आणखी वाचा- भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणात खळबळ

“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत,” असं सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.