भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ईव्हीएम हॅकिंगबद्दल गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने केला होता. भाजपाने हा दावा खोडत हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. तोच धागा पकडून खडसे यांनी स्वपक्षालाच खिंडीत पकडले आहे. हॅकर खोटारडे असतात तर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला असा सवाल केला आणि यामुळे माझं राजकीय आयुष्य बरबाद झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर अडचणीत सापडलेल्या भाजपने हॅकर खोटारडे असतात असे म्हटले. पण आता याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षाला अर्थात भाजपला खोचक सवाल विचारला आहे.

एका जाहीर कार्यक्रमात खडसे बोलत होते. ईव्हीएम हॅकिंगबद्दल भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असा दावा सय्यद शुजा या हॅकरने केला. त्याने भारतात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, असाही दावा केला. मात्र, भाजपाने एका हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा असे म्हणत सर्व आरोप फेटाळले होते.

त्यावर खडसे म्हणाले की, माझ्यावरही एका हॅकरने (मनीष भंगाळे) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत असल्याचा दावा केला होता. चौकशी झाली, पण यात काहीच हाती लागले नाही. पण माझे राजकीय आयुष्य बरबाद झाले. माझ्यावेळी हॅकरवर का विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.