लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपामध्ये महाभरतीच सुरू झाली आहे. भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगवर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रथमच मौन सोडले आहे. विरोधी पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. पण त्यांच्या निष्ठा काळजीपूर्वक तपासून घ्या नाहीतर आपल्याकडे येऊन भाजपाविरोधातच काम करतील, असा सल्ला खडसे यांनी दिला आहे.

भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांची भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली होती. त्यानंतर खडसे पक्षातून बाजूला पडले होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बुथप्रमुखांची जळगावात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या काही दिवसांपासून भाजपात जाण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, याच मुद्यावर एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना सर्तक केले. खडसे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचाच मुद्दा होता. लोकांनी त्यांना समोर ठेवूनच भाजपाला मतदान केले. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे मुद्दे असणार आहेत. त्यात भाजपाकडे येणाऱ्या नेत्यांचा ओढा वाढला आहे. नेते आणि कार्यकर्ते दोन्हींची संख्या मोठी आहे आणि पक्ष वाढविण्याच्या दृष्टिने त्यांना पक्षात घेणेही गरजेचे आहे. पण, त्यांच्या निष्ठा तपासून घ्या. पक्षात आल्यानंतर आपल्या पक्षाचेच काम करीत आहेत का पाहायला हवे. भाजपात आले आणि निष्ठा मात्र पूर्वीच्याच पक्षावर असेल तर नुकसान आपलेच होईल. त्यामुळे सर्तक व्हा गाफील राहू नका, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.