धडगाव तालुका व परिसरातील ७३ वाडय़ा-पाडय़ांना दिवाळीपूर्वी महसुली गावांचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. मोलगीला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागातर्फे सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त मच्छिमार सहकारी संस्थांना साहित्य वाटप सोहळा अक्कलकुवा येथे झाला. यावेळी खडसे यांनी विविध घोषणा केल्या. धडगाव तालुक्यातील वाडय़ांना महसूल गाव म्हणून दर्जा देण्याचे दीड वर्षांपूर्वी राज्यपालांनी जाहीर करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याचा विषय ‘लोकसत्ता’ ने मांडला होता. त्याची दखल घेत खडसे यांनी दिवाळीपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे नमूद केले. मोलगी येथे विविध शासकीय कार्यालये सुरू झाल्यावर तालुका निर्मितीचा धोरणात्मक निर्णय घेताना मोलगीचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन खडसे यांनी दिले.
यावेळी आ. उदेसिंग पाडवी, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी, जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक अधिकारी भक्ती पेजे यांनी सूत्रसंचालन केले.