एकनाथ खडसे यांची व्यथा
राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागल्याचे शल्य भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे हे संधी मिळेल त्या कार्यक्रमातून व्यक्त करत असून त्याचीच प्रचिती रविवारी जिल्ह्य़ातील फैजपूर येथे आयोजित कार्यक्रमात आली. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खडसे यांनी प्रसार माध्यमांच्या बातम्यांवर सरकारने विश्वास ठेवला अन् आपली ४० वर्षांची तपश्चर्या एका क्षणात वाया घालवली अशी खंत व्यक्त केली.
फैजपूर म्युन्सिपल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खडसे आणि तावडे हे दोघे उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना टीव्हीवर येणाऱ्या सर्व बातम्या खऱ्या नसतात आणि खोटय़ाही नसतात असे नमूद केले. त्यानंतर भाषण देणाऱ्या खडसे यांनी हाच धागा पकडून आपण मात्र खोटय़ा बातम्यांना बळी पडल्याची व्यथा मांडली. सरकारने प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवला. त्यामुळे ४० वर्ष केलेली तपश्चर्या एका क्षणात वाया गेली, असे खडसे यांनी नमूद करताच उपस्थित सर्वजण चकीत झाले. खडसे यांनी याआधी मागील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांवर थेट नाव न घेता टीका केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 12:52 am