News Flash

माझी अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी; खडसे यांची खंत

खडसे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीवरून त्यांच्या समर्थकांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये अडगळीत पडलेले एकनाथ खडसे यांनी आपला असंतोष पुन्हा व्यक्त केला आहे. ‘‘माझी अवस्था भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे’’, अशी टिप्पणी खडसे यांनी जळगावमध्ये भाजपच्या बैठकीत केली.

खडसे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीवरून त्यांच्या समर्थकांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. ‘नाथाभाऊ निर्दोष असताना इतके दिवस त्यांना मंत्रिपदापासून दूर का ठेवले जात आहे,’ असा सवाल माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी करत त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडण्याची मागणी केली. खडसे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याचा ठराव करावा, ही मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली. त्यावर खडसे यांनी समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला. ‘‘राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींप्रमाणे राज्यात माझे स्थान झाले आहे. मी अनेक वष्रे पक्षासाठी काम केले असून, पक्षविस्तारासाठी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर अडवाणींनीही पक्षासाठी असेच काम केले. मात्र, सध्या नव्या नेत्यांना संधी मिळते आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे, अशी स्थिती बनली आहे’’ असे खडसे म्हणाले.

खडसे समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही सावध पवित्रा घेतला. ‘‘खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, अशी सर्वाचीच मागणी आहे. मात्र, त्यांच्याविरोधात जमीन गैरव्यवहार प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागले’’, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले.

याआधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही खडसे यांची नाराजी लपून राहिली नव्हती.

मोर्चा काढण्याची सूचना

अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी  पक्षाच्या बैठकीतच आपणास नाथाभाऊंसाठी ठराव मांडायचा असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत ठरावाला अनुमोदन दिले. खडसे यांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यतील शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे शिष्टमंडळ घेऊन जावे. तसेच आझाद मैदानावरही मोर्चा काढावा, असेही डॉ. पाटील यांनी सुचविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2017 1:01 am

Web Title: eknath khadse advice supporters to keep silence
टॅग : Eknath Khadse
Next Stories
1 इंदिराजी, वसंतदादांमुळेच देशाचा पाया मजबूत – प्रतिभा पाटील
2 सरकारला विरोधकांच्या एकजुटीमुळे इच्छा नसूनही कर्जमाफी द्यावी लागली
3 रेल्वे धावण्यापूर्वीच पुलाची भिंत कलली
Just Now!
X