माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि भाजपची बदनामी केल्याप्रकरणी ‘आप’च्या माजी पदाधिकारी अंजली दमानिया यांच्याविरोधात शिरपूर न्यायालयात भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. दमानिया यांनी २०१५ मध्ये वेळोवेळी खोटी विधाने करून माजी महसूलमंत्री खडसे यांची बदनामी केली. पर्यायाने भाजपचीही बदनामी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मे २०१६ मध्ये दमानिया यांनी प्रसारमाध्यमांना खोटी माहिती देऊन खडसे यांच्यावर आरोप केले. तसेच मुलाखती देतानाही त्यांनी खडसेंसह पक्षाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळविण्याच्या हेतूने दमानिया यांनी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

महामार्गावर शिक्षकाचा अपघाती मृत्यू

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथील बेळणे येथे विजयदुर्ग हायस्कूलचे शिक्षक नीलेश श्रीकांत मेस्त्री हे अपघातात जागीच ठार झाले. शिक्षक नीलेश मेस्त्री मोटरसायकलवरून प्रवास करताना मोटरसायकल घसरल्यानंतर मेस्त्री यांच्या डोक्यावरील हेल्मेट बाजूला पडून डोके रस्त्यावर आपटल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त केला.

पोलिसांनी स्पॉट पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, हवालदार सूर्याजी नाईक, शिवाजी सावंत व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.