भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मतदानास आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. खडसेंचा हा मतदारसंघ असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सकाळी साडेसात ते साडेनऊ या मतदानाच्या पहिल्या दोन तासांमध्ये केवळ १० टक्के मतदान झालंय, पण दुपारनंतर मतदानकेंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी अशी मुख्य लढत या निवडणुकीत आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माधुरी आत्माराम जाधव या रिंगणात आहेत. तर भाजपाकडून नजमा इरफान तडवी आणि शिवसेनेच्या ज्योती दिलीप तायडे या देखील रिंगणात आहेत, त्यामुळे तिरंगी लढतही येथे पाहायला मिळू शकते. येथील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी(महिला) राखीव ठेवण्यात आलं आहे. निवडणुकीत एकूण २३ हजार ७२६ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

नगरसेवकांच्या सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागांवर भाजपाने उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेच्यावतीने १३, काँग्रेस ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त ३ जागा लढवत आहे.