माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. या पोस्टवरून सुरू झालेला भाजपातील राजकीय गोंधळ थांबायची चिन्हे दिसत नाही. पंकजांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गौप्यस्फोट केला. त्यानंतर भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे निराश झाल्या होत्या. त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाही. अशातच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. खुद्द पंकजा मुंडे यांनीही फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

मात्र, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी “ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,” प्रकाश शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे हे भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. “पक्षातून कुणीही फुटणार नाही. पक्ष एकसंध असल्याचं भेटीला जाण्यापूर्वी खडसे म्हणाले होते. त्याचबरोबर आपण गोपीनाथ गडावरील कार्यक्रमालाही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू असून, नेमकी चर्चा कशावर सुरू आहे, हे कळू शकले नाही.