भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची विरोधकांनी जळगावमधील मुक्ताईनगर येथे फार्म हाउसवर भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचा यात समावेश होता. नेत्यांनी खडसेंसह यावेळी एकत्र फराळही केला. या खास ‘भेटीची’ चर्चा सोशल माध्यमाद्वारे जळगावपासून राज्यभरात वेगाने पसरली.

शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे व संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध विरोधी पक्ष नेत्यांनी संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यात शनिवारी विरोधक जळगावात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेली ही ‘सदिच्छा’ भेट राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळावा या मागणीसाठी विविध पक्षातील नेते मंडळीनी एकत्र येत ‘सिंदखेडराजा’ येथून दुस-या टप्प्यातील संघर्ष यात्रेस सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या या विरोधकांशी झालेल्या भेटीतून अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.