एकनाथ खडसे यांची भूमिका

कृषी विकास घडवून आणण्याकरिता खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे. मी सत्तेत असो वा नसो, खान्देशसाठी कृषी विद्यापीठ होणे ही भूमिका कायम राहणार आहे, असे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा येथे खडसे यांनी यासंदर्भात मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेचे धुळे जिल्हा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी स्वागत केले आहे. धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील २०१० पासून पाठपुरावा करीत आहेत. विधानसभेत २००९ ते २०१४ या कालावधीत या विषयावर झालेल्या चर्चेप्रसंगी धुळे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे, अशी मागणी प्रा. पाटील यांनी केली होती. २०१५ पासून कृषी विद्यापीठ धुळ्यात की जळगावला या विषयावर खडसे व धुळे जिल्ह्याच्या कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीत मतभेद निर्माण झाले होते. बुधवारी शहादा येथे खडसे यांनी कृषी विद्यापीठ खान्देशातच व्हावे, असे स्पष्ट केल्याने विद्यापीठ धुळे जिल्ह्यात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खडसे हे खान्देशचे नेतेही आहेत. ते सत्तेत नसले तरी महायुती सरकारमध्ये त्यांचा दबदबा कायम आहे. उपलब्ध अहवालाच्या शिफारसीनुसार कृषी विद्यापीठ खान्देशात म्हणजेच धुळ्यात होण्याबाबतची अडचणही आता दूर झाली असून खडसेंबाबतचा संभ्रमही दूर झाला आहे, अशी प्रतिक्रिया शरद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८ मध्ये कृषी विद्यापीठ स्थापनेबाबतचे सुतोवाच कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीकडे केले आहे. येत्या हिवाळी किंवा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी विद्यापीठ स्थापनेबाबत घोषणा होऊ  शकते. यासाठी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीला जागरुक रहावे लागणार आहे. समिती सप्टेंबर महिन्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक प्रा. पाटील यांनी दिली आहे.