01 March 2021

News Flash

भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचा पुनरुच्चार

संग्रहित (PTI)

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांनी यावेळी चंद्रकांत पाटील वगळता आपल्याला कोणत्याही भाजपा नेत्याचा मनधरणीसाठी फोन आला नव्हता ्असं खुलासा केला.

“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.

आणखी वाचा- खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“तरीही त्यानंतर मी चार वर्ष काढली. नऊ महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दुख नाही. पण मनस्ताप खूप झाला याचं दु:ख आहे. आयुष्यात अनेक पदं मी ताकदीने मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने मला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती, तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या,” असं आव्हान यावेळी त्यांनी दिलं.

आणखी वाचा- ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना…; मुनगंटीवारांची खडसेंना भावनात्मक साद

“मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकाप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.

आणखी वाचा- ग्राम पंचायत निवडणूक, सरपंच ते महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास

“पदावर आहेत त्यांचं भाजपासाठी काय योगदान आहे अशी विचारणा करणार आहे. पक्षात घेतलेल्यांना मंत्रीपदं दिली. आम्ही ४० वर्ष घालवली, पण पदासाठी लाचार नव्हतो. फडणवीसांनी आरोप करण्याआधी कोणीही आरोप केलेला असेल तर सांगा. माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलं, त्यामुळेच पक्षत्याग करावा लागतोय,” असं खडसेंनी यावेळी सांगितलं. फक्त फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडत असल्याचं  खडसेंनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

“माझा ट्विटर पासवर्ड दोघा तिघांकडे आहे. चुकून जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट केलं होतं. त्यामुळे लगेचच मी ते डिलीट केलं,” असा खुलासा यावेळी एकनाथ खडसे यांनी केला. “मी आधीही विचारलं होतं आणि आजही माझा काय गुन्हा काय आहे ते पक्षाने स्पष्ट करावं,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली. “मी कोणालाही घाबरत नाही, कोणाचे पाय चाटणाऱ्यातला तर अजिबात नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

“आपल्यासोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये येणार नाही. रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनी ठरवावं. पण त्यांनी मला भाजपा सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत,” असं खडसेंनी यावेळी सांगितलं. “भाजपा सोडण्याच्या वेदना आहेत, पण इतक्या खालचं राजकारण करणाऱ्यासोबत काम करणं कठीण आहे. उद्या बलात्काराचा आरोप करतील,” असं खडसेंनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीकडून आपल्याला कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही असं यावेळी खडसेंनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:12 pm

Web Title: eknath khadse on decision of joining ncp devendra fadanvis sgy 87
Next Stories
1 अर्णब प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून सिब्बल यांची नियुक्ती, प्रत्येक सुनावणीसाठी मोजणार इतके लाख
2 मी तुम्हाला पुन्हा उभं करेन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं बळ
3 आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार; राष्ट्रवादीला विश्वास
Just Now!
X