गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी (२३ ऑक्टो.) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पक्षप्रवेश झाला. खडसे यांनी बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचा आज राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झाला. यावेळी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त करतानाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक शब्द दिला.

पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना खडसे म्हणाले, “शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजपा पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही!”

आणखी वाचा- नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल- शरद पवार

“मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय पक्षाने दिलं? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाहीत. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. कारण पाठीमागून कारवाया करत राहाणं हे माझ्या तत्वात कधीच बसलं नाही, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.

आणखी वाचा- त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन; एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

“भूखंडाची चौकशी माझ्यामागे लावण्यात आली. काही दिवस जाऊ द्या कुणी किती भूखंड घेतले आहेत, ते मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जाऊन जे वागले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे. मी राजकीय जीवनातून निवृत्ती घेऊन घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपाला हेच वाटत होतं, कारण मला भाजपा तर काही देणार नव्हतं. तिकिट मागितलं तर तुम्ही ज्येष्ठ आहात असं म्हणत मला तिकीट नाकारण्यात आलं. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक मला सल्ले देत होते”, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.