मी राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारा विरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा ? मी गुन्हा केला असेल तर राजकारणातून निवृत्त होईन असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच असल्याचे सांगितले.

न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. युवा संसदेत आदर्श मंत्री पुरस्कार राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे, डॉ.नीलम गो-हे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, मागील ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले तसेच गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे तसेच गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारीविरोधात लढा उभारला होता. मात्र आता इतरांसारखे केव्हा झालो हे लक्षात आले नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.