भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज्यातील भाजपा नेतृत्वाविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर खडसे बाहेर पडल्यानं पक्षावर त्याचा परिणाम होईल असंही बोललं जात असून, याच विषयावर पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भूमिका मांडली आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते. दानवे म्हणाले,”काही वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचं कसं होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपामध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर कोण?, असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्यानं भाजपा थांबलेला नाही. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष कधीच थांबत नाही. भाजपाकडे कार्यकर्त्यांची फळी आहे असून, नेतृत्त्वाची ही पोकळी भरुन निघेल,” असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

आणखी वाचा- “एकट्या फडणवीसांमुळे…,” खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी दिली प्रतिक्रिया

“उत्तर महाराष्ट्रात भाजपाकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे नेते आहेत. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व अहमदनगरमध्येही आमच्याकडं सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपला आहे,” असं दानवे म्हणाले.

आणखी वाचा- एकनाथ खडसेंनी स्वतः केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपाची खोचक टीका

“…म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रीपद गेलं असावं”

“पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं,” असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.