24 November 2020

News Flash

केंद्रीय नेत्यांबाबतचे खडसे यांचे वक्तव्य न पटणारे – दानवे

राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये मेळ नाही आणि ते किती दिवस टिकेल हे त्यांनाही माहीत नाही

संग्रहित छायाचित्र

जालना : दिल्लीतील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांचे वक्तव्य कुणालाही पटण्यासारखे नाही. उलट त्यांनी पक्ष सोडू नये अशीच भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. परंतु या प्रयत्नास यश येऊ शकले नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसे यांनी भाजपमध्ये भवितव्य नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतीलच एका वरिष्ठ नेत्याने दिल्याचे सांगितले होते. या संदर्भात दानवे म्हणाले, की अशा प्रकारे खडसे यांना भाजपमधील कुणा नेत्याने सल्ला दिलेला नसेल हे आपण आतापर्यंतच्या राजकारणातील अनुभवावरून सांगू शकतो. खडसे यांनी आपल्या मनातील भावनांची जाहीर वाच्यता करण्याऐवजी पक्षनेतृत्वाकडे बोलावे अशी आमची इच्छा होती. माझ्या समक्ष त्यांनी अमित शहा, नड्डा यांची भेट घेतली. नितीन गडकरी, फडणवीस, मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आपण स्वत: त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी प्रयत्न केले. परंतु आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राज्यात विरोधी पक्षनेते असताना खडसे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराचे वाभाडे अनेकदा काढले, तर पुढे खडसे यांच्याकडे मंत्रिपद आल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांच्यावर अनेक आरोप केले. आता खडसे यांनी त्यांच्याच पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांनी पक्षातच राहावे, अशी आमची सर्वाचीच इच्छा आहे. खडसे यांच्यासारखे जुने आणि अनुभवी नेते पक्ष सोडून गेल्याचे दु:ख आम्हाला जरूर आहे. परंतु आता त्यांच्यामागे राष्ट्रवादीत जाणाऱ्यांची रांग लागेल असे मानण्यास काही अर्थ नाही. राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये मेळ नाही आणि ते किती दिवस टिकेल हे त्यांनाही माहीत नाही. ज्या सरकारकडून जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या अपेक्षा नाहीत, तेथे जाण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रांग कशासाठी लावतील?

आता मुख्यमंत्री होणार का..?

राज्य विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदी असताना खडसे यांनी त्या वेळी पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले असते, तर कदाचित ते मुख्यमंत्रीही झाले असते. परंतु मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करून ती पूर्ण झाली नाही म्हणून पक्ष सोडणे योग्य वाटत नाही. आता राष्ट्रवादीत गेल्याने ते मुख्यमंत्री होणार आहेत काय? पक्ष सोडायचा असेल तर कुणावर तरी आरोप करावा लागतो म्हणून खडसे त्यासाठी फडणवीस यांना जबाबदार धरीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणत्या प्रकारे त्यांचा वापर करील, हे माहीत नाही. त्यांचा वापर विकासासाठी करण्याऐवजी फडणवीस आणि भाजपवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी केला तर ते दुर्दैवी ठरेल, असेही दानवे म्हणाले.

पक्ष संघटना महत्त्वाची

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचे आम्हाला नक्कीच दु:ख आहे. त्यांच्यामागे त्यांच्या जिल्ह्य़ातील तसेच अन्य भागातील कार्यकर्ते जातील असे नव्हे. भाजप हा संघटनेस अधिक महत्त्व देणारा पक्ष असल्याने कार्यकर्ते ही पोकळी भरून काढतील. एकावेळी आमचे लोकसभेत दोनच खासदार होते. आता आम्ही केंद्रात आणि देशातील १८ राज्यांत सत्तेवर आहोत. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आधारावर भाजपचे कार्य चालते.

– रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:07 am

Web Title: eknath khadse remark on central leadership is not convincing raosaheb danve zws 70
Next Stories
1 हिंगोलीतील पिंपळदरीच्या ‘वीरमातेस’ चार एकर जमीन देण्याचे आदेश
2 करोनाच्या सावटाखाली हर्णेमध्ये ‘शाळा आपल्या दारी’
3 वस्त्रदालनाच्या कमानीवर लावलेली ४०० मोरपिसे जप्त
Just Now!
X