“पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करुन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडलं आहे. रोहिणी खडसे यांचा याचमुळे पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचही असचं म्हणणं आहे,” असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या अशा लोकांची नावं पुराव्यासहीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असंही खडसे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवरुन सुरु असणाऱ्या चर्चेबद्दल खडसे बोलत होते.

“परळीमध्ये पंकजांचा पराभव झालेला नसून पक्षातील लोकांनी केलेल्या कारस्थानामुळे त्या निवडणूकीमध्ये पडल्या. पक्षातील काही लोकांनी पंकजांविरोधात उभ्या असणाऱ्या धनंजय मुंडेंना मदत केल्याचा आरोप पंकजांचे कार्यकर्ते करत आहेत. रोहिणी खडसेंविरोधात तर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काम केलं. मी स्वत: अशा अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो. मी या सर्वांची नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवली आहे. याला बराच काळ झाला असला तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसून त्यांच्यावर कारवाई होण्याची वाट पाहत आहे,” असं खडसे म्हणाले आहेत.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्याबद्दल बोलताना खडसेंनी “आपली या विषयावरुन पंकजा मुंडेशी चर्चा झालेली नाही,” असं मत व्यक्त केलं आहे. भगवानगडावर मागील अनेक वर्षांपासून मी जात आहे. यंदाही आमंत्रण आल्यास आपण तिथे नक्की उपस्थित राहू असंही खडसेंनी स्पष्ट केलं आहे. “मागील अडीच दशकांमध्ये अनेकदा मी शिवसेनेत जाणार याबद्दल चर्चा झाली आहे. मी गेलो तर तुम्हाला सांगून जाईल,” असंही खडसेंनी शिवसेना प्रवेशासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.