जळगाव जिल्ह्य़ात रास्ता रोको, बंद; राजीनाम्याचे शिवसेना, राष्ट्रवादीकडून स्वागत
विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर त्याचे परस्परविरोधी पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटले. या निर्णयाचे शिवसेनेसह राष्ट्रवादीने फटाके फोडून आणि मिठाई वाटप करत स्वागत केले. खडसे समर्थकांनी रास्ता रोको व जाळपोळ करत राजीनाम्याचा निषेध केला. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर व रावेर तालुक्यात बंद पाळण्यात आला. भाजपच्या तालुकास्तरीय काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्यास सुरूवात केली. परंतु, भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले होते.
सकाळपासून खडसे यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा सुरू झाल्यामुळे पोलीस यंत्रणा दक्ष झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा रद्द करत त्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे निर्देश दिले गेले. खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरसह जळगाव शहर व परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. राजीनाम्याचे वृत्त आल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले. मुक्ताईनगरमधून जाणाऱ्या जळगाव-नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केले. काही ठिकाणी पेटते टायर रस्त्यावर फेकून वाहतूक रोखण्याचे प्रयत्न झाले. भुसावळ तालुक्यात फेकरी टोल नाक्यावर एसटी बसवर दगडफेक झाली. या परिसरात समर्थकांनी भाजपच्या इतर मंत्र्यांच्या फलकांची मोडतोड केली. रावेर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. या घडामोडी सुरू असताना मुक्ताईनगर व जळगाव शहरातील खडसे यांच्या बंगल्यावर शुकशुकाट होता.
खडसे समर्थक निषेध करत असताना भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीने या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत केले. जळगाव शहरात शिवसैनिकांनी गोलाणी मार्केट, टॉवर चौक, सुभाष चौक या ठिकाणी पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. खडसे यांनी नैतिकतेच्या आधारावर आधीच राजीनामा द्यायला हवा होता. अखेर पक्षाने राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडले. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात १५ ते २० वर्षांपासून असलेला दहशतवाद संपल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी खडसे यांनी जिल्ह्यात दहशत पसरविल्याचे सांगत त्यांच्यावर कोणी आरोप केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची त्यांची कार्यशैली असल्याचे नमूद केले.