भाजपात असूनही पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याचं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.चार दिवसांपूर्वी नड्डा यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या घडामोडी याबाबत मी नड्डा यांनी माहिती दिली. त्यानंतर ज्यांनी पक्षविरोधी काम केलं आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करु असं आश्वासन नड्डा यांनी आपल्याला दिलं असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नंतर बोलावलं जाईल असंही जे. पी. नड्डा यांनी सांगितल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. जळगाव या ठिकाणी ही माहिती खडसे यांनी दिली. भाजपा कार्याध्यक्षांनी आश्वासन दिलं आहे. मात्र कारवाई झाल्यावरच मी समाधानी झालो की नाही ते सांगेन असंही एकनाथ खडसेंनी पत्रकारांना सांगितलं.

नाराज खडसेंनी काय म्हटलं होतं?
१२ डिसेंबर रोजी गोपीनाथगडावर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली. “पंकजाताई भाजपात आहेत मात्र माझा काही भरवसा नाही” असं प्रतिपादन एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ खडसे पक्ष सोडणार का? या चर्चांनाही उधाण आलं होतं. एकनाथ खडसे यांनी गोपीनाथगडावर केलेलं भाषण भाजपाच्या विरोधातलं होतं. आपल्या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती. “ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमच्याशी असं वागत असतील तर काय बोलणार?” असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

खडसेंनी घेतली होती पवारांचीही भेट
एकनाथ खडसे यांनी या वक्तव्यानंतर शरद पवार यांचीही दोन ते तीनवेळा भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? या चर्चाही रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी तूर्तास मी पक्षातच आहे असंही स्पष्टीकरण या चर्चांवर दिलं होतं. मात्र शरद पवार यांनी जेव्हा ‘खडसेंचं समाधान होईल अशी सामग्री माझ्याकडे नाही’ हे वक्तव्य केलं तेव्हा या चर्चा थांबल्या.

खडसेंबाबत काय म्हटले होते फडणवीस?
दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या मनात असलेल्या खदखदीबाबत वक्तव्य केलं होतं. एकनाथ खडसे नाराज आहेत याची कल्पना आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चेला तयार आहोत. पक्षात सुरु असलेले वाद त्यांनी चर्चेने सोडवले पाहिजेत असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं.