News Flash

“खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय”, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून गिरीश महाजनांनी घेतलं तोंडसुख!

एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात खडसेंचाच आवाज असल्याचं सांगितलं जात आहे.

जळगावच्या राजकीय वर्तुळात आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू होती. या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे गिरीश महाजनांविषयी आक्षेपार्ह उल्लेख करत असल्याचं ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप किंवा त्यामधील आवाज हा एकनाथ खडसेंचाच आहे का याची निश्चित खातरजमा अद्याप झालेली नाही. मात्र, या ऑडिओ क्लिपवरून आता भाजपा आमदार आणि जळगावमध्ये ज्यांचं एकनाथ खडसेंसोबत विळ्या-भोपळ्याचं नातं आहे, अशा गिरीश महाजनांनी खडसेंवर तोंडसुख घेतलं आहे. “खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“..त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल”

गिरीश महाजनांनी यावेळी खडसेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. “त्यांनी अतिशय अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यात खडसे साहेबांचा दोष नाहीये. मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना कोण काय आहे हे सगळं माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळालेली नाही. लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघात नाकारलेलं आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एका मुलाचा एका व्यक्तीशी संवाद असून ही व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे असल्याची चर्चा आहे. खडसेंसारखाच या व्यक्तीचा आवाज देखील आहे. या मुलाने ऑडिओ क्लिपमध्ये गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर खडसेंनी “बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो”, असं विधान केलं आहे. या मुद्द्यावरून आता जळगावच्या स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 9:10 pm

Web Title: eknath khadse viral audio clip girish mahajan slams on comments pmw 88
Next Stories
1 लॉकडाउन वाढणारच; पण किती ते ३० एप्रिलला कळेल! आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
2 नागपूर : सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी त्याने खर्च केले ८५ लाख रुपये
3 महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही! राजेश टोपेंनी केलं जाहीर!
Just Now!
X