जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या एकेकाळच्या गुरुशिष्याच्या नात्यात अंतर निर्माण झाले आणि आता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी उभयता सोडत नाहीत. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, महाजन यांनी भाजपामधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज दिलं होतं. महाजन यांचं हे चॅलेंज खडसेंनी स्वीकारत प्रदेक्षाध्यशांनी परवानगी दिल्यास पाडापाडीचं राजकारण करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांची नावे जाहीर करेन, असा थेट इशारा खडसेंनी गिरीश महाजन यांना दिला आहे. खडसेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

नाराज खडसेंची मनधरणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जळगावात धाव घेतली आहे. शनिवारी जळगावात पाटील यांनी खडसेंची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. जळगावात भाजपाची विभागीय समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे खडसेंनी पाठ फिरवल्याचे वृत्त प्रथम आले होते. मात्र साडेतीन वाजताच्या सुमारास खडसे बैठकीला दाखल झाले.

बैठकीला पोहचण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच नाराज नसल्याचेही सांगितले. पाडापाडीचं राजकारण करणाऱ्याचे पुरावे असतील तर ते खडसे यांनी जाहीर करावेत, असे गिरीशभाऊ म्हणाले आहेत. त्यानुसार मी माझ्याकडचे पुरावे नावानिशी जाहीर करायला तयार असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभेची उमदेवारी न मिळाल्याने तावडे आणि खडसे दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. तावडे यांनी त्याबाबत जाहीर भाष्य टाळले असले तरी खडसे यांनी मात्र अनेक वेळा असंतोषाला वाट करून दिली आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडून ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न होत असून नाराज आपोआप एकत्र येतात, असा आक्रमक सूर खडसे यांनी लावला. पक्षांतर्गत कुरघोडय़ा करणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांची नावे पक्षनेतृत्वाला कळवली आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पक्षनेतृत्व काय भूमिका घेते आणि कारवाई करते, ते पाहू, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले भाजपमधील नेते एकत्र येत असल्याचे चित्र आहे.