४० वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात भाजपाचं काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यानी अखेरीस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चीत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महत्वाची भूमिका आणि खातं मिळालेल्या एकनाख खडसेंवर काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने खडसेंना तिकीट नाकारलं. त्यामुळे पक्षात आपला अपमान होत असल्यामुळे खडसे काही दिवसांपासून नाराज होते. अखेरीस खडसे यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री आणि माजी आमदार राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होईल असं म्हटलं आहे. खडसेंना भाजपात जी किंमत मिळत होती ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळणार नाही. त्यांच्यासोबत कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाचा व्यवस्थित विस्तार होत आहे. खडसेंनी आता जी हिंमत केली आहे, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असं राम शिंदे म्हणाले.

आणखी वाचा- ग्राम पंचायत निवडणूक, सरपंच ते महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास

राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपली नाराजी असल्याचं सांगितलं. आपल्यावर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामुळे आपली सहनशक्ती संपली. ४० वर्ष काम करुनही आपल्याविरोधात खालच्या स्तरावर राजकारण करण्यात आल्यामुळे अशा लोकांसोबत काम करणं जमणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं.