अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील न्यायालयाने ‘पॉस्को’अंतर्गत २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व २१ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.ं

वर्षभर सुरू असलेल्या खटल्याला पॉस्को न्यायालयामुळे तत्काळ न्याय मिळाला आहे. सक्तमजुरीची एवढी मोठी शिक्षा दिली जाण्याची जिल्ह्यतील पहिलीच घटना आहे.

गोविंद हरिश्चंद्र मंणचेकर (वय ७८, रा. दळे, राजापूर) असे आरोपीचे नाव असून राजापूर तालुक्यातील मठवाडी—दळे—दळे येथे १६ मार्चला २०१९ रोजी

दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी झोपाळ्यावर खेळत असताना आरोपीने तिच्याशी लगट करून लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर ती घरी गेली असता आजीला रक्त दिसले. आजीने विचारल्यानंतर मुलीने आरोपी मंणचेकर आजोबांचे नाव सांगितले. आजीने तत्काळ मुलीच्या आई—वडिलांना बोलावून घेतले व वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवी कलम ३७६ ए व बी, तसेच बालकांचे संरक्षण कायदा २०१२ व ३, ४, ५  आणि ६ अन्वये  गुन्हा दाखल केला

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक लोकेश कानसे, पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मांगले यांनी या गंभीर गुन्ह्यचा सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.  या खटल्याचा निकाल विशेष पॉस्को न्यायाधीश व्ही. ए. राऊत यांनी दिला. न्यायालयाने आरोपीला कलम ३७६ एबीअन्वये २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, भादंवि ४ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी ५ हजार रूपये दंड, ६ नुसार १० वर्षे शिक्षा ५ हजार रूपये दंड, भादंवि ८ नुसार ३ वर्षे शिक्षा व १ हजार रुपये असा एकूण २१ हजार रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अ‍ॅडव्होकेट मेघना नलावडे व अ‍ॅडव्होकेट प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.

पॉस्को कायद्यात २०१६ ला बदल करण्यात आला. त्याचा फायदा झाला. पोस्कोअंतर्गत आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झालेली पहिलीच घटना आहे.

नवीन न्यायालयामुळे झटपट न्याय मिळाला असल्याचे अ‍ॅडव्होकेट नलावडे यांनी सांगितले.