|| अशोक तुपे

नगरची वेगळी राजकीय संस्कृती; विखे-पाटील अपवाद ठरणार का?

चिरंजीव डॉ. सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असला तरी तूर्तास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार दिसत नाही. मुलांनी किंवा सुनेने पक्ष सोडल्यावर त्याच्याबरोबर ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर न करण्याची राजकीय संस्कृती नगर जिल्ह्य़ात सुरू आहे. या रुळलेल्या वाटेने विखे-पाटील जाणार का, त्याला अपदाव करणार याचे हे एक कोडे आहे. याचे उत्तर विधानसभा निवडणुकीतच मिळू शकेल.

नगरच्या राजकारणात काळे व कोल्हे हे दिग्गज राजकीय घराणे आहे. पूर्वी जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गीय शंकरराव काळे यांचे चिरंजीव माजी आमदार अशोक काळे हे २००४ साली शिवसेनेत गेले. दोनदा आमदार झाले. पण स्वर्गीय शंकरराव काळे काही सेनेत गेले नाही. आता त्यांचे चिरंजीव आशुतोष काळे राष्ट्रवादीत आले आहेत. हाच प्रकार कोल्हे यांच्या राजकीय कुटुंबात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली. पण माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मात्र पक्षांतर केले नाही.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त हे २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेत गेले.पण माजी खासदार तनपुरे हे सेनेत गेले नाही. ते तटस्थ राहिले.आता प्राजक्त हे पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत. राष्ट्रवादीत माजी खासदार तनपुरे हे सक्रिया झाले आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकर गडाख यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शेतकरी क्रांतिकारी पक्ष त्यांनी एका तालुक्यापुरता स्थापन केला. मात्र यशवंतराव गडाख हे त्यात सक्रिय राहिले नाहीत. तूर्तास गडाख परिवार अजूनही दोन्ही काँग्रेसपासून अंतर राखून आहेत.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा राजकीय प्रवास समाजवादी विचारसरणीतून सुरू झाला. जनता दलात ते होते. त्यांचे चिरंजीव प्रताप ढाकणे हे मात्र भाजपा गेले.आता ते राष्ट्रवादीत आहेत. असे असले तरी बबनराव ढाकणे यांनी पक्षांतर केले नाही. ते तटस्थ राहिले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्वर्गीय पी.बी.कडू  यांचे चिरंजीव अरुण कडू हे सुरवातीला पक्षात होते पण नंतर ते राष्ट्रवादीत गेले. पी.बी.कडू हे मात्र पक्षात राहिले. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा या भारतीय जनता पक्षात गेल्या.पण नागवडे यांनी अधिकृत पक्षांतर केले नव्हते. ते तटस्थ राहिले.आता अनुराधा पुन्हा काँग्रेस पक्षात आल्या आहेत. विखे परिवार मात्र त्याला अपवाद होता. माजी खासदार स्वर्गीय  बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे यांनी एकत्रित शिवसेनेत प्रवेश केला. नंतर दोघे पुन्हा काँग्रेस पक्षात आले. आता सुजय यांनी भाजपात प्रवेश केला. पण त्याच्यासोबत राधाकृष्ण विखे यांनी प्रवेश केला नाही.