22 July 2019

News Flash

जळगाव जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेनेत संघर्ष

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील उमेदवार निश्चित झालेले नसताना धरणगाव येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचा प्रचार न करण्याचा ठराव करण्यात आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळेच युतीधर्म न पाळल्यास त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटू शकतील, अशी धमकी आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे दिली आहे.

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही भाजपने दोन्ही जागांवर दावा केला असताना रावेर मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा, यासाठी शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते आग्रही आहेत. जिल्ह्य़ात सेना आणि भाजपमध्ये वितुष्ट असल्याने वरिष्ठ पातळीवर युती झालेली असली तरी भाजपचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने दुरावा वाढला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने जमीन बिनशेती करण्याच्या प्रकरणावरून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या विरोधात समाजमाध्यमात संदेश दिल्यापासून वाद वाढला. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व इतर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपचा निषेध करण्यात आला आहे.

खडसे यांचा इशारा

युतीधर्म न पाळल्यास त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटतील, असा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात दिला. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तोडण्याचा वरिष्ठांचा सामूहिक निर्णय होता. आपण फक्त युती तोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेने मागील गोष्टी विसरून आताच्या लोकसभा निवडणुकीत युतीधर्म पाळावा. जळगाव जिल्’ातील निवडणुकीत विरोधाची भूमिका कायम ठेवल्यास राज्यात अन्य ठिकाणी शिवसेनेला भाजपची मदत मिळणार नाही, असेही आमदार खडसे यांनी नमूद केले आहे.

First Published on March 15, 2019 1:22 am

Web Title: election 2019 in maharashtra 3