|| संजय बापट

१९८०च्या दशकात तत्कालीन जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता गेल्या ४० वर्षांत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची पंरपरा आहे. कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणाऱ्या या मतदारसंघात लागोपाठ दुसऱ्यांना लोकप्रतिनिधी निवडून येत नाही. आता पुन्हा एकदा भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यात सरळ लढत होण्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये युती झाली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजूनही मनोमीलन झालेले दिसत नाही. आपल्या श्रद्धास्थळावर अर्थात थेट मातोश्रीवरच भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सोमय्यांना धडा शिकविण्यासाठी गेली पाच वर्षे जंग जंग पछाडणाऱ्या शिवसैनिकांना आता त्याच सोमय्यांचा झेंडा हाती कसा घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांचे पाठबळ आणि उमेदवारी मिळविण्याची सोमय्यांसाठी तर गेली पाच वर्षे विस्कटलेली पक्ष कार्यकर्त्यांची घडी नीट बसवत विरोधकांसमोर आव्हान उभे करण्याची पहिली लढाई आव्हानात्मक असेल.

मुंबईत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येणारा एकमेव लोकसभा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई. मागील म्हणजेच सन २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपचे किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्या वेळी आपच्या तिकिटावर प्रथमच आपले राजकीय भाग्य आजमावणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकरांची उमेदवारी सोमय्यांच्या पथ्यावर पडली होती.

संमिश्र वस्तीचा मतदारसंघ

संमिश्र वस्तीच्या मतदारसंघात मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग,  विक्रोळी, घाटकोपर पश्चिम या भागात मराठी वस्ती अधिक असून, मुलुंड पश्चिम आणि घाटकोपर पूर्व या भागात गुजराती मतदारांचा बोलबाला आहे. मानखुर्द, गोवंडी या भागात मुस्लिमांचा वरचष्मा असून या मतदारसंघात दलित, उत्तर भारतीयांचाही टक्का निर्णायक आहे.

या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. युती झाली असली तरी सोमय्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक मनापासून तयार दिसत नाहीत. त्यामुळेच युतीची घोषणा झाल्यांतरही सोमय्यांच्या उमेदवारीस शिवसैनिकांकडून उघड विरोध होत आहे. मात्र राजकारणात कोणी कुणाचा कायमचा वैरी नसतो. युती झाली असून शिवसैनिकांचाही आपल्याला पाठिंबा आहे. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलताना आपण कधीही पक्षीय राजकारण केले नसून शिवसेना-भाजप कार्यकर्ते आणि या भागातील मतदार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा दावा करीत सोमय्या यांनी प्रचाराही सुरुवात केली आहे.

सोमय्यांबद्दल शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनीही आघाडीचा उमेदवार म्हणून गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीसह काँग्रेस, समाजवादी, मनसे अशा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधून आणि सोमय्यांबद्दल भाजप-शिवसेनेत असलेल्या अंतर्गत नाराजांना आपलेसे करून ही लढाई जिंकण्याची तयारी पाटील यांनी सुरू केली असली तरी राष्ट्रवादीतील  गटबाजी आणि निस्तेज काँग्रेस ही पाटील यांच्यासाठी डोकेदुखी आहे. सोमय्या यांना अडचणीत आणण्यासाठी मराठी विरुद्ध गुजरात असा रंग दिला जाण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये पाटील यांनी सोमय्या यांचा पराभव केला होता.

समाजवादी पक्षाने आपली भूमिका अजून स्पष्ट न केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केल्याने पाटील यांच्यासाठी लढाई सोपी राहणार नाही. मध्यंतरी मनसेला येथून उमेदवारी देण्याची चाचपणीही राष्ट्रवादीने सुरू केली होती. मात्र शिशिर शिंदे हे या भागातील मनसेचे एकमेव नेते शिवसेनेत गेल्याने आता याही पक्षाची मजल झेंडे आणि फलकांपर्यंत राहिल्याचे बोलले जात आहे.

गेल्या पाच वर्षांत मुंबईत सर्वाधिक विकासकामे मार्गी लावली असून राज्यात सर्वाधिक निधी या मतदारसंघात आणला. उपनगरीय रेल्वेवर होणारे अपघात रोखण्यासाठी ४२५ प्लॅटफॉर्मची उंची वाढविली. १२ डब्यांच्या सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यासाठी ११२५ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून आणला. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडसह अनेक रस्ते विकास प्रकल्प, मेट्रोचे चार मार्ग मतदारसंघात आणले. तसेच विद्याविहार, विक्रोळी येथे मध्य रेल्वेवर उड्डाणपूल, झोपडपट्टीतील लोकांसाठी १० हजार शौचालये, १२७ शाळांना संगणक वाटप अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलाय.     –  किरीट सोमय्या, खासदार, भाजप

पाच वर्षांपूर्वी फुटपट्टी घेऊन रेल्वे प्लॅटफार्मची उंची मोजणारे किरीट सोमय्या निवडणुकीनंतर मात्र मतदारसंघातून गायब आहेत. मोदींची लाटही आता ओसरली आहे. केवळ घोषणांच्या पलीकडे या भागातील लोकांना काहीही मिळालेले नसून लोकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. ईशान्य मुंबईतील मतदारांना आता बदल हवा असून  पुन्हा एकदा या मतदारसंघात परिवर्तन निश्चित होईल. युतीमधील कलहाचा आम्हाला निश्चितच लाभ होईल. आपल्या नेतृत्वाला तुरुंगात डांबण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिक मदत करण्याची सुताराम शक्यता नाही.      – संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार