22 July 2019

News Flash

किस्से आणि कुजबूज : मतांसाठी डोळ्यांत येती अश्रू..

मतांसाठी राजकारणी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात.

मतांसाठी राजकारणी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. मतदारांच्या हृदयाला भिडण्याकरिता विविध प्रयोग केले जातात. यातही भावनिक मुद्दा हा फारच महत्त्वाचा ठरतो. मतदारांना काय भावेल हे ओळखून नेतेमंडळी मग तसे वर्तन करतात. खरे तर अपघातानेच १९९६ मध्ये पंतप्रधानपद मिळालेले एच. डी. देवेगौडा यांनी आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत मतदारांच्या हृदयाला भिडण्याचे चांगलेच अवगत केले आहे. जाहीर सभांमधून डोळ्यांत अश्रू आणायचे, बस्स.. मतदार भावनिक होतात. देवेगौडांबद्दल सहानुभूती वाढते. बुधवारी कर्नाटकातील आपल्या बालेकिल्ल्यात देवेगौडांच्या डोळ्यांत असेच अश्रू आले. फक्त देवेगौडाच नव्हे तर त्यांचे मंत्री पुत्र रेवण्णा, राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले नातू यांच्याही डोळ्यांत अश्रू उभे राहिले. कर्नाटकातील वोकलिंग समाजाचे प्राबल्य असलेला हसन जिल्हा हा देवेगौडा यांचा बालेकिल्ला. दक्षिण कर्नाटकातील या जिल्ह्य़ाने देवेगौडा यांना कायम साथ दिली. १९९६ पासून लोकसभेत देवेगौडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शरद पवार यांच्याप्रमाणेच देवेगौडा यांच्यापुढे तिसऱ्या पिढीच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न उभा ठाकला. शरद पवारांनी नातवासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचे जाहीर केले. देवेगौडा यांचे तसे नाही. पुत्र कुमारस्वामी मुख्यमंत्री, दुसरे पुत्र मंत्री. आता तिसऱ्या पिढीची सोय लावण्याकरिता हसन हा मतदारसंघ नातवाला सोडण्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्याला भरभरून पाठिंबा दिला तसा नातवालाही द्या, असे आवाहन करताना देवेगौडा यांच्या डोळ्यांत अश्रू आले. यामागे पाच दशके साथ दिल्याबद्दल मतदारांबद्दल कृतज्ञता की नातवासाठी मतांची बेगमी याचीच चर्चा सुरू झाली. राजकीय कारकीर्दीत देवेगौडा नेहमीच डोळ्यांत अश्रू आणून भावनिक होतात, अशी टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जाते. देवेगौडा आता थकले आहेत; पण १९९६ प्रमाणेच पुन्हा चमत्कार होऊ शकतो, असे वाटत असावे. यामुळेच आपण लोकसभेत निवडून आलेले असले पाहिजे हा त्यांचा समज झालेला दिसतो. म्हणूनच देवेगौडा उत्तर बेंगलूरु मतदारसंघातून लढणार आहेत. एकाच वेळी तीन पिढय़ांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिल्याचा मतदारांवर कितपत भावनिक परिणाम झाला हे २३ मे रोजी म्हणजेच निकालाच्या दिवशीच समजेल.

शक्तिप्रदर्शनासाठी मजूर

निवडणुकांमध्ये शक्तिप्रदर्शन तर करावेच लागते. आता ही शक्ती दाखवायची कशी? मजूर संस्था चालविणाऱ्या दोन तरुणांनी शक्कल लढविली. उस्मानाबाद जिल्हय़ात सध्या समाजमाध्यमांमध्ये जाहिरात फिरत आहे- ‘शक्तिप्रदर्शनासाठी मजूर मिळतील!’ सभांना गर्दी व्हावी म्हणून मजूर आणले जातात. तुम्ही कोणालाही मतदान करा, पण त्या दिवशी भाषण ऐकण्यासाठी गर्दी करा, एवढेच त्यांचे काम असते. वाहन व्यवस्था आणि भोजन मिळतच असते. वरून रक्कमही दिली जाते. हे राजकारणातील सत्य दोन तरुणांनी अधिकृत केले. त्यांनी समाजमाध्यमांमध्ये जाहिरातच केली. मजूर पुरवठा केला जाईल. शंभर जणांना किमान रक्कम मिळेल अशी व्यवस्था करणाऱ्या या दोघांचा राजकीय विचार चिंतेमध्ये टाकणारा आहे. दिवसाला चारशे रुपये मिळतात. दुष्काळ असल्याने हाताला काम नाही. बसूनच आहेत सारे. त्यापेक्षा नीटपणे ‘लोकशाही मार्गाने’ निम्मे पैसे कमावणे चुकीचे कसे असेल? निंबोणी मजूर संस्था अशी नोंदणी असणाऱ्या संस्थेच्या संचालकांनी शक्तिप्रदर्शनासाठी मजूर पुरविण्याची जाहिरात केल्याने राजकीय पक्षाला गर्दी जमविण्यासाठी मागच्या दाराने पैसे देण्याची गरज उरणार नाही. सध्या उमेदवारीचे घोळ असल्याने कोणी मजूर पुरवा तुमचे, असे सांगितले नाही; पण निवडणुकीत असेही घडते आहे.

– मुंबईवाला

 

First Published on March 15, 2019 1:17 am

Web Title: election 2019 in maharashtra 6