23 July 2019

News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘स्वाभिमानी’ साथ?

विश्वासात न घेता खासदार राजू शेट्टींना पाठिंब्याचा निर्णय?

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रबोध देशपांडे

विश्वासात न घेता खासदार राजू शेट्टींना पाठिंब्याचा निर्णय?

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आला. या निर्णयामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश निश्चित मानला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीने विश्वासात न घेता खासदार राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. त्यामुळे आघाडीला ‘स्वाभिमानी’ची साथ मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये महाआघाडी करण्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ अनेक दिवसांपासून सुरू आहे. अद्यापही त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर स्वाभिमानीचा दावा असल्याने चर्चा रेंगाळली.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केवळ हातकणंगले मतदारसंघ सोडण्याची तयारी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात पाठिंबा जाहीर करण्यात आला. मात्र, बुलढाणा आणि वर्धा जागेवरून तिढा कायम आहे. बुलढाण्यातून लढण्यासाठी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर इच्छुक आहेत. बुलढाण्यातून उमेदवार जाहीर करून ही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर चर्चा न करता राष्ट्रवादीने एकतर्फी निर्णय घेतल्याचे रविकांत तुपकर यांचे म्हणणे आहे.

खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादीने परस्पर निर्णय घेतला. यासंदर्भात चर्चा झाली नव्हती. राष्ट्रवादीची ही भूमिका संयुक्तिक नाही. खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून उद्या महाआघाडी की स्वबळ याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते फोनवर संपर्कात आहेत. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात बैठक घेऊन चर्चा करणे अपेक्षित होते.    – रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जागा वाटपावरून चर्चा सुरू होती. त्यामध्ये काही जागांवरून तिढा होता. खासदार राजू शेट्टींसाठी जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे चर्चा पूर्ण होऊन स्वाभिमानीचा आघाडीत समावेश राहील.      – डॉ. राजेंद्र शिंगणे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बुलढाणा.

First Published on March 15, 2019 1:36 am

Web Title: election 2019 in maharashtra 7