|| हर्षद कशाळकर

रायगड मतदारसंघ तसेच मावळ मतदारसंघात येणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील तीन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला शेकापच्या ताकद आणि मदतीची आवश्यकता लागणार आहे. दोन्ही मतदारसंघांत शेकापवरच राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे तर मावळमधून पार्थ पवार हे निवडणूक लढणार आहेत. मावळ मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत हे रायगड जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट होतात. यामुळे राष्ट्रवादीला पार्थच्या विजयासाठी रायगडमधील मते लागणार आहेत.

दोन्ही मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी वाताहत झाली आहे. पक्षातील जुने जाणते नेते पक्षाला सोडून गेले आहेत. उत्तर रायगडमधील उरण, पनवेल, पेण, अलिबाग आणि काही प्रमाणात खोपोली तालुक्यात शेकापची ताकद आहे. संघटनात्मक बांधणीमुळे पक्षाने अलिबाग, पेण विधानसभा मतदारसंघांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघ शेकापला गमवावे लागले असले तरी या मतदारसंघातील ग्रामीण भागात शेकापची पकड कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी विरोधात लढली होती. दोन्ही मतदारसंघांतून शेकापने राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातून त्या वेळी निवडणूक लढविणाऱ्या रमेश कदम यांना फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. मात्र १ लाख २९ हजार मत पडली होती. दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ३ लाख ६४ हजार ८२९ मते पडली होती. लक्ष्मण जगताप यांच्या बंडखोरीची राष्ट्रवादीला मोठी किंमत चुकवावी लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते तटकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे अज्ञातवासात आहेत. भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. अलिबाग, पेण, महाड, पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष नावालाही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अलिबाग आणि पेणमधून मिळणाऱ्या शेकापच्या मदतीवरच राष्ट्रवादीची वाटचाल अवलंबून राहणार आहे यात शंका नाही.

विरोधकांची ताकद वाढली

शेकापचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच पार्थ पवारांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने केली आहे. शेकापकडून मागील निवडणूक लढवणारे लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये आहेत. पनवेल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपने जिंकल्या आहेत. मावळमधील सहापैकी एकच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची परिस्थिती फारशी चांगली नाही. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील अनेक नेते पक्षाला सोडून गेले आहेत.

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी पक्षांसोबत आघाडी केली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी मावळ आणि रायगड दोन्ही मतदारसंघातून आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करणार आहोत. आमची आघाडी भक्कम आहे. निकालानंतर याचे सकारात्मक परिणाम दिसतील.    – आमदार जयंत पाटील, सरचिटणीस शेकाप