|| दिगंबर शिंदे, लोकसत्ता

पाच जिल्ह्य़ांचा मतदारसंघ, विखुरलेला पदवीधर मतदार या साऱ्यात त्यांची शोधाशोध करणे आणि त्याच्यापर्यंत उमेदवाराचे नाव पोहोचविणे यंदा सर्वच पक्ष, नेते, उमेदवारांना अवघड जात आहे. कार्यकर्त्यांची अपुरी फौज आणि त्यातच करोनाचे भय यामुळे यंदा हे काम अवघड असल्याचे दिसू लागताच आता सर्वच पक्ष, पुढाऱ्यांनी त्यांच्या साखर कारखान्यातील कामगार, शाळेतील शिक्षकांना प्रचाराला जुंपल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्यात अटीतटीची लढत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर हे पाच जिल्हे येतात. हा सर्व भाग सहकारक्षेत्रातील साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांच्या जाळ्याने विणलेला आहे.
या बहुतांश संस्था या कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्यांच्या अखत्यारीत काम पाहात आहेत. या संस्थांमधील कर्मचारी हा त्यांच्या कुठल्याही निवडणुकीत हक्काचा कार्यकर्ता म्हणून वापरला जातो. यंदा तर या निवडणुकीचे कार्यक्षेत्र भलेमोठे आहे.

मतदारांची शोधाशोध करणे आणि त्याच्यापर्यंत उमेदवाराचे नाव पोहोचविणे यंदा सर्वच उमेदवारांना अवघड जात आहे. या साऱ्यावर उतारा म्हणून या राजकीय नेत्यांनी त्यांच्या संस्थांमधील ही कर्मचाऱ्यांची फौज प्रचाराच्या कामी उतरवली आहे. प्रत्येक पुढाऱ्याने त्यांच्या संस्थांमधील कामगारांवर आपआपल्या पक्ष, भूमिकेप्रमाणे जबाबदारी वाटली आहे.
रोज सकाळी या कर्मचाऱ्यांच्या हाती एकेका मतदान केंद्रातील मतदारांची यादी देऊन त्यांची भेट घेण्याचे फर्मान सोडले जाते. या एका मतदान केंद्रामध्ये नऊशे ते हजार मतदार येतात. मग हे कर्मचारी या याद्या घेत या मतदारांचे पत्ते शोधत प्रचार मोहिमेवर बाहेर पडतात.

साखर कारखाने, सहकारी बँका, बाजार समिती अशा सर्वच क्षेत्रांतील हे कर्मचारी, शिक्षण संस्थांमधील शिक्षक सध्या या नव्या कार्यात सर्वत्र दंग असलेले चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.

शिक्षक आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीसाठी वेठबिगाराप्रमाणे वापर करण्याची पद्धत पूर्वीपासूनचीच. पण यंदा करोनाभयामुळे त्याचा सरसकट अवलंब झाल्याचे दिसत आहे. संस्थेत नोकरी करायची असेल तर ही असली प्रचाराची कामे करावीच लागतात. विरोध केला तर नोकरी धोक्यात येते. या विरोधात संघटनात्मक आवाजही उठवला जात नाही.  – प्रा. तुषार पाटील, कवठेमहांकाळ.