राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या गोटात असलेल्या अनिश्चिततेच्या सावटामुळे कोकणात अजूनही निवडणूक प्रचाराला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.
जागावाटपाच्या मुद्दय़ावरून प्रमुख राजकीय पक्षांचे घोडे गेले काही दिवस अडले असल्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेनेने विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे धोरण जाहीर केले आहे. भाजपकडून गुहागर मतदारसंघातून डॉ. विनय नातू, रत्नागिरीतून माजी आमदार बाळ माने आणि कणकवलीतून विद्यमान आमदार प्रमोद जठार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. संबंधित उमेदवारांनी आपापल्या पक्षकार्यकर्त्यांच्या बठका-मेळावे, तसेच वाडय़ा-वस्त्यांवर फिरून जनसंपर्क सुरू केले असले तरी मुळात युती राहणार की नाही, याचीच अजून खात्री नसल्यामुळे प्रचाराला धार येऊ शकलेली नाही. तसेच दापोली आणि राजापूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे, तर सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवाराची अजूनही निश्चिती झालेली नाही. त्यामुळे आघाडीच्या गोटातही सामसूमच आहे.
    काँग्रेस आघाडी व महायुतीचे नेते मुंबई-दिल्लीत बसून चच्रेचे गुऱ्हाळ चालवत आहेत. वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. पण त्यातून सामान्य कार्यकर्त्यांमधील गोंधळच जास्त वाढत आहे. येत्या दोन दिवसांत हे सर्व संपुष्टात येईल आणि त्यापाठोपाठ प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होऊन नवरात्रीच्या मुहूर्तावर निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.