गद्दार, गुन्हेगार अशी टीका करीत काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांच्यावर आगपाखड करणाऱ्या उत्तमसिंह पवार यांनी आपली भाषा बदलत नितीन चांगला मुलगा आहे, असे वक्तव्य केले. ५ एप्रिलपर्यंत उमेदवारी बदलेल, अशी आशा असल्याचे सांगत एक अर्ज पक्षाचा व एक नामनिर्देशनपत्र अपक्ष भरून ‘निवडणूक लढविणारच’ असल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत सांगितले. उमेदवारी नाकारल्याने आक्रमक वाटणाऱ्या पवारांचे सूर आज मात्र खालच्या पट्टीतले होते.
औरंगाबाद मतदारसंघातील निवडणुकीत हमखास उतरेन, असे सांगताना पवार म्हणाले, की मी अजून पक्ष सोडला नाही. ५ तारखेपर्यंत उमेदवारी बदलली जाऊ शकते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारांच्या कामांचे व क्षमतांचे फेरमूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे दोन उमेदवारीअर्ज दाखल करणार आहे. एक काँग्रेस पक्षाचा असेल. ५ तारखेपर्यंत त्याची वाट पाहू अन्यथा अपक्ष निवडणूक लढवू.
उमेदवारी मिळाली नाही, म्हणून पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेद्र दर्डा यांच्यावर बठकीत टीका करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी दर्डा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. स्थानिक पातळीवरील चांडाळ चौकडी, असे उल्लेखही भाषणात करण्यात आले. बठकीत उत्तमसिंह पवार यांनी दर्डाचे नाव न घेता बरीच आगपाखड केली होती.
काही दिवसांपूर्वी आक्रमक वाटणारे उत्तमसिंह आज मात्र कमालीचे मवाळ झाले होते. काँग्रेसमधील नेते आपले मित्र आहेत. बठकीनंतर दर्डाची भेट झाली. आमदार कल्याण काळे यांच्याशी रोज बोलणे होते. नितीन पाटील चांगला मुलगा आहे, अशी विधाने त्यांनी केली. पवार यांची बदललेली भाषा ऐकल्यानंतर विधान परिषदेचे नक्की झाले का, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तशी बोलणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी झाल्याचे मान्य करून ते म्हणाले, की मला त्यांनी दिलेले पर्याय मान्य नाहीत. त्यामुळे निवडणुकीस उभा राहणार आहे. शिवसेनेचे नेते अपप्रचार करीत असून माघार घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.