लोकसभा निवडणुकीची कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २० टेबलांवर होणार आहे . याबाबतची संभ्रमावस्था गुरुवारी दूर झाली आहे. कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मतमोजणी २० टेबलांवर करण्यास निवडणूक आयोगाने गुरुवारी मान्यता दिली आहे. यापूर्वी १४ टेबलांवर मोजणी होण्याची शक्यता वर्तवली होती . या निर्णयामुळे मतमोजणी गतीने होण्याची शक्यता वाढली आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडून आढावा घेतला होता.

न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत यावेळी प्रथमच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’मधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आयोगाच्या निर्देशानुसार १४ टेबलांवर मतमोजणी करणे अपेक्षित आहे. याप्रमाणे मतमोजणी झाल्यास रात्री उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली गेली . यामुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच १४ ऐवजी टेबलं वाढवून ते २० केल्यास मतमोजणी ही लवकर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला. त्याला गुरुवारी मान्यता मिळाली. भारत निवडणूक आयोगाचे सचिव आय. सी. गोयल यांनी याबाबतचे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे.