लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील एकूण ७७० शस्त्र परवानाधारकांपैकी कोणी एखाद्या गुन्ह्यात संशयित असेल तर त्यांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा करावीत आणि या स्वरूपाचे कोणतेही प्रकरण नसलेल्या अन्य परवानाधारकांनी आचारसंहिता काळात ही शस्त्रे घराबाहेर काढू नयेत, असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने सूचित केले आहे. निवडणूक यंत्रणेने जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची माहिती संकलित केली आहे. त्यात निफाड उपविभागात सर्वाधिक म्हणजे २८६, तर दिंडोरी उपविभागात सर्वात कमी म्हणजे ५० शस्त्रपरवानाधारक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या पूर्वतयारीने वेग घेतला आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने शस्त्र परवानाधारकांची माहिती संकलित केली. त्यात नाशिक उपविभागात ५५, दिंडोरी उपविभाग २८६, मालेगाव उपविभाग १२३, कळवण उपविभाग ५१, बागलाण ५१, येवला उपविभाग ९७, चांदवड उपविभागांतर्गत ५२ आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर ५५ असे एकूण ७७० परवानाधारक आहेत. त्यातील कोणावर फौजदारी स्वरूपाचा काही गुन्हा न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यांना आपले शस्त्र पोलिसांकडे जमा करावे लागणार आहेत. या स्वरूपाचे प्रकरण नसलेल्या परवानाधारकांना आपले शस्त्र आचारसंहिता काळात घरात ठेवावे लागणार आहे.
तक्रार निवारण केंद्र स्थापन
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांकडून केला जाणारा खर्च तसेच आदर्श आचारसंहितेच्या भंगाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र आणि कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांसह कोणालाही ०२५३ – २३१६२१४ या क्रमांकावर तक्रारी नोंदविता येतील.