|| सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील जिल्हा प्रशासनाची नवी डोकेदुखी

शंभरी पार केलेल्या मतदारांची वाढलेली संख्या आणि निवडणुकीच्या काळातील पाणीटंचाई हे मराठवाडय़ातील जिल्हा प्रशासनासमोरची डोकेदुखी ठरू लागली आहे.

मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे वय १०० किंवा त्यापेक्षा अधिक दाखविले गेल्याने निवडणूक आयोगाने त्याची गंभीरपणे दखल घेतली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ही संख्या हजार ते दीड हजार असल्याचे दिसून आले आहे. आता हे मतदार एवढय़ा संख्येने आहेत काय किंवा त्यांचे वय टंकलिखित करताना चूक झाली आहे काय, याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २६ लाख ४९ हजार ६४१ मतदारांची नोंद आहे. त्यात नव्याने एक लाख ६४ हजार ६८३ मतदारांनी नव्याने यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आहेत. साधारणत: दोन हजार ९५७ मतदान केंद्रांवर मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही बदल होऊ शकतात. सध्या मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्याच्या मतदार याद्यांमध्ये कमालीच्या चुका असल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले आहे. एकाचे नाव आणि दुसऱ्या धर्मातील आडनाव असेही प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची अलीकडेच हजेरी घेतली. यादी टंकलिखित करताना शंभराहून अधिक वय असणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचेही दिसून आले आहे. प्रत्येक जिल्हय़ात हजारो नावांसमोर शंभर वय नमूद असल्याने हे मतदार खरोखर आहेत काय किंवा त्यांचे वय चुकले आहे, याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘‘वयाची शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याची चर्चा आहे.  मात्र यादी अद्याप उपलब्ध झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाकडून ती प्रत्येक जिल्हय़ात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची खातरजमा केली जाईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मतदान केंद्रांवर जाणवेल, याचा प्रशासनाला अंदाज आहे. पाण्याचे जार मतदान केंद्रांवर पोहोचवावे लागतील, तशी सोय करण्याचा विचार सुरू आहे.’’   – प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग औरंगाबाद</strong>

वीज उपलब्धतेचाही प्रश्न

बहुतांश शाळांमध्ये मतदान केंद्र असते. जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांनी वीज देयक न भरल्याने वीज कापण्यात आली आहे. ही रक्कम भरण्यासाठी आता नव्याने तरतूद करण्याची गरज आहे. काही जिल्हय़ांमध्ये १४ वित्त आयोगाच्या निधीतून ही रक्कम भरण्याचा विचार सुरू झाला आहे. अद्याप मतदान केंद्रांची तपासणी पूर्ण झालेली नाही. त्यानंतर किती मतदान केंद्रांवर हा प्रश्न आहे हे लक्षात येईल, असे सांगण्यात येते.

पाण्याचीही समस्या

’मराठवाडय़ातील बहुतांश केंद्रांवर पाण्याची समस्या गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांना पाणी द्यायचे कसे, असा प्रशासनासमोर पेच आहे. पाण्याच्या बाटल्या पोहोचविण्यासाठी स्वतंत्रपणे यंत्रणा लावावी लागेल, असे अधिकारी सांगतात.

  • मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना पाणी देता येईल, पण मतदानावेळी रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांना पाणी देणे हा पेच असल्याचे सांगण्यात येते. तलाठी व गावातील पोलीस पाटील यांना सांगून रांजण भरून ठेवता येईल का, हे तपासले जात आहे.
  • सध्या मराठवाडय़ात ७६३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मतदानाच्या दिवशीपर्यंत त्यात मोठी वाढ होईल. त्यामुळे यंत्रणेला मोठय़ा बाटल्यांमधून (जार) पाणी देण्याचा विचार सुरू आहे.

आयोगाकडून दखल

शंभरीपार असलेले १५०० मतदार असल्याचे तोंडी सांगण्यात आले असून त्याची यादी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य स्तरावरील बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाल्याच्या वृत्तास निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दुजोरा दिला.