जिल्ह्य़ातील दोडामार्ग आणि वैभववाडी नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून उद्या रविवार, १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सामना रंगणार आहे. या दोन ग्रामपंचायतींच्या नगर पंचायत निवडणूक रणधुमाळीत मतदारराजाला मात्र लक्ष्मीदर्शनाचा योग गवसला. त्याचे रूपांतर मतदानात होणार किंवा कसे हे मोजणीतून स्पष्ट होईल.

दोडामार्ग तालुका हा गोवा सीमेलगतचा आहे. दोडामार्ग ग्रामपंचायतीची नगर पंचायत झाली. गोव्याच्या सीमेवरील गावात झालेली निवडणूक रंगतदार ठरली आहे, तर वैभववाडी तालुका कोल्हापूर सीमेलगतचा आहे. या दोन टोकांच्या नगर पंचायत निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीत रंगत आणली. वागवे -वैभववाडी नगर पंचायतीत १७ जागांपैकी चार बिनविरोध ठरल्या आहेत. त्यात काँग्रेस दोन, भाजप एक, गाव पॅनेल एक असा बिनविरोध जागांचा तपशील सांगितला जात आहे. आता १३ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस १३, शिवसेना-भाजप १२, गाव पॅनेल ३, राष्ट्रवादी ५, मनसे १ लढत आहे. शिवसेना-भाजपमध्ये राज्यस्तरावर एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप होत असले तरी दोडामार्ग व वैभववाडीत खांद्याला खांदा लावून प्रचार सुरू आहे. वैभववाडीत एकूण मतदार १४७६ आहेत.
दोडामार्ग नगर पंचायतीत १७ जागांसाठी लढत असून, २४९५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. शिवसेना-भाजप १७, काँग्रेस-राष्ट्रवादी १७, मनसे ४, अपक्ष ९ असे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा युती व आघाडीच्या अस्तित्वाच्या लढाईच्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे मंत्री विनोद तावडे, शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर, काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीलेश राणे यांच्यासह भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले अशा अनेक नेत्यांनी प्रचारात भाग घेतला.