काँग्रेसला शह देण्याकरिता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने वेळोवेळी विविध पर्यायांचा वापर केला. पण हेच प्रयोग आता राष्ट्रवादीवर उलटू लागले आहेत. जयंत पाटलांच्या इस्लामपूरमध्ये पराभव, आर. आर. आबांच्या तासगावमध्ये भाजपला बहुमत हे सारेच राष्ट्रवादीसाठी धक्कादायक आहे. भाजपने हळूहळू या जिल्ह्य़ात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवडय़ात विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघात पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. या पाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसने आपले वर्चस्व असलेल्या क्षेत्रात प्रभाव कायम ठेवला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस आणि कडेगाव या दोन पालिकांमध्ये यश मिळवून दिले. विधान परिषदेची निवडणूक जिंकल्याने डॉ. कदम यांचे प्रस्थ वाढले आहेच.

सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दादांच्या घराण्याचे वर्चस्व मोडीत काढण्याकरिता जयंत पाटील यांनी शड्डू ठोकला. २००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांच्या विरोधात अजित घोरपडे यांना ताकद दिली. पण जिल्ह्य़ाने दादांच्या नातवाच्या बाजूने कौल दिला. जयंतरावांचे प्रयत्न फसले. त्या आधी जयंत पाटील यांनी आर. आर. आबांना चिमटे काढले. याच जयंत पाटील यांना राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी विरोधकांची मोट बांधून धडा शिकविला. पक्षांतर्गत कोणीही मोठा होणार नाही याची दक्षता घेत त्यांचे चालणारे राजकारण जयंतरावांच्या अंगलट आले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेची सूत्रे हाती घेताच इस्लामपूरहून सांगलीस येण्यास ४० वर्षांचा अवधी जावा लागला हे सूचक विधान बरेच काही सांगून जाते. एका बाजूला पक्षांतर्गत नेतृत्वाचा विकास होणार नाही हे पाहत असताना काँग्रेसमध्येही गटबाजीला प्रोत्साहन, ताकद देण्याचा प्रयत्न केला. दादा गटाबरोबरच डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्यासाठीही प्रयत्न केले. जे पेरले तेच जयंतरावांच्या अंगाशी आले आहे.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. पण खासदार संजयकाका पाटील यांनी जुने उट्टे काढण्याची संधी सोडली नाही. तासगावमध्ये नगराध्यक्षपदाबरोबरच भाजपला बहुमतही मिळाले. आबांची राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्येला पुढे केले जात आहे. अलीकडेच तिची राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पण आबांच्या कन्येचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही.

  • गेल्या निवडणुकीत सांगलीतून लोकसभेवर भाजपचे संजयकाका पाटील तर विधानसभा मतदारसंघात भाजपचेच गाडगीळ विजयी झाले होते.
  • भाजपने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली असतानाच पालिका निवडणुकीत शिरकाव केला आहे.
  • आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.