|| अशोक तुपे

सहकारातील दिग्गज प्रस्थापित नेत्यांचा प्रभाव असलेला शिर्डी लोकसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला, पण गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसला मोठा धक्का बसला. युतीत शिवसेनेचा भगवा फडकला.  नगर जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे ही नेहमी प्रस्थापितांच्या ऐनवेळच्या खेळीने बदलत असतात. त्यात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिका अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या तरी शिवसेनेसमोर गड कायम ठेवण्यासाठी यंदा मोठे  आव्हान आहे.

शिर्डी (पूर्वीच्या कोपरगाव) लोकसभा मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी नेतृत्व केले. काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिला. स्वर्गीय शंकरराव काळे, प्रसाद तनपुरे यांनीही काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले. काँग्रेसच्या गटबाजीतून भीम बडदे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार होते. आठवलेंना प्रस्थापितांचा छुपा विरोध होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार वाकचौरे यांना छुपी मदत झाली. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा गाजला. त्यातून आठवलेंचा पराभव झाला. प्रस्थापित नेत्यांना गृहीत धरणे राज्यातील नेतृत्वाला महाग पडले. असे असले तरी सहकाराचा प्रभाव ओसरू लागल्याने लोकांवरील प्रस्थापित नेतृत्वांची पकड कमी झाल्याचे स्पष्ट झाले. २०१४ च्या निवडणुकीत वाकचौरे हे प्रस्थापित नेत्यांच्या भीतीने काँग्रेसमध्ये गेले. माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्यामुळे त्यांनी बदल केला. मात्र नगरच्या राजकारणात विखेविरोधी गटाच्या हेव्या-दाव्याचा झटका वाकचौरेंना बसला. त्यात मोदी लाटेमुळे शिवसेनेचे लोखंडे निवडून आले. विखे हे कुणालाही निवडून आणू शकतात. ही राजकीय धारणा मोदी लाटेने खोटी ठरविली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वर्गीय गोविंदराव आदिक, भानुदास मुरकुटे, यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासारखे दिग्गज नेते लोखंडेंचा विजय रोखू शकले नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस, गटबाजी हीदेखील वाकचौरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. दोन निवडणुकांमुळे प्रस्थापितांना हादरे बसले आहेत. आमदार अशोक काळे यांनी लोखंडेंच्या विजयाला हातभार लावला. त्यावेळी ते शिवसेनेत होते. काळे यांचे दोन्ही काँग्रेसशी संबंध होते. त्याचा पद्धतशीर फायदा काळे यांनी लोखंडे यांच्या विजयासाठी घेतला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील समीकरणे आता बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणेतून निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. त्याकरिता मतदारसंघाची अदलाबदल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. विखेंच्या उमेदवारीमुळे काही राजकीय समीकरणे बदलतील. डॉ. विखे यांना उमेदवारी मिळाली तर मतदारसंघ एकतर राष्ट्रवादीकडे जाईल किंवा उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचा उमेदवार निश्चित नाही. दलित चळवळीतील अशोक गायकवाड हे दोन्ही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लोकसभेसाठी उभे करण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्नन आहे. कांबळे यांच्यामुळे लोखंडे व वाकचौरे दोघांचीही अडचण होईल. माजी खासदार वाकचौरे भारतीय जनता पक्षात आहेत. सेना-भाजप युती झाली तर शिर्डीची जागा ही सेना सोडणार नाही. वाकचौरे यांची अडचण होईल. युती झाली नाही तर वाकचौरे हे भाजपचे उमेदवार असतील. आपचे उमेदवार नितीन उदमले आता भाजपत आले आहेत. ते वाकचौरे यांची डोकेदुखी ठरू शकतात. ऐनवेळी पक्षांतराचाही खेळ रंगेल. अद्याप राजकीय चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र पक्षीय पातळीवर शिवसेनेपुढे काही अडचणी उभ्या आहेत.

मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब मुरकुटे व स्नेहलता कोल्हे हे दोन आमदार आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी आमदार भानुदास मुरकुटे हे कुठल्याही पक्षात नाहीत. राष्ट्रवादीतून ते बाहेर आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी आमदार अशोक काळे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादीत गेले आहेत. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षात बढती मिळाली असून त्यांचे दिल्लीत वजन वाढत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होईल. शिवसेनेकडे एकही संस्था नाही. भाजपकडे मात्र किमान तीन नगरपालिका, दोन नगर पंचायती आहेत. प्रस्थापितांविरुद्ध लढणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला निवडणुकीत मोठी धडपड करावी लागणार आहे.

खासदार लोखंडे हे कर्जत-जामखेडचे पंधरा वर्षे आमदार होते. ते मुंबईत राहात. लोकसभेच्या वेळी तेरा दिवसात मोदी लाटेत खासदार झाले. प्रस्थापित नेतृत्वाशी त्यांनी मधुर संबंध ठेवले आहेत. ते फारशी राजकीय चबढब करत नाहीत. ते मतदारसंघात तीन वर्षे फिरकलेच नाहीत. आता सक्रिय झाले. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मतदार यादीतील नाव काढून शिर्डीत टाकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वात प्रथम लोकसभेसाठी लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

अकार्यक्षम खासदार

सदाशिव लोखंडे हे अकार्यक्षम खासदार आहेत. साडेचार वर्षे ते मतदारसंघातच फिरकले नाहीत. त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेतच विरोध आहे. त्यांचा जनसंपर्कच नाही. गावाची नावेच त्यांना माहीत नाहीत तर कार्यकर्ते कसे माहीत असणार. निळवंडेसाठी आपल्याच कारकीर्दीत प्रस्ताव गेला. ते केवळ नाटक करतात. मतदार आता त्यांना स्वीकारणार नाहीत. मोदी लाटेत ते जिंकले पण आता ते शक्य नाही. – भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार, भाजप

पाच वर्षांत केलेली कामे व योग्यतेमुळेच सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. सुरुवातीला दीड वर्ष मतदारसंघ नवीन असल्याने संपर्कासाठी अडचण आली. पण १८२ गावांत विकासकामे केली. ८ शेतकरी कंपन्या, निळवंडेला २२०० कोटीच्या निधीला मंजुरी, महामार्गाची कामे, आरोग्य सुविधा केंद्र ही कामे आहेत. धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. खासदार म्हणून पक्ष, गट, तट याचा भेद केला नाही. सकारात्मक कामे केली. वादातीत राहिलो. काम करणारा व सर्वाना बरोबर घेऊन जाणारा खासदार म्हणून लोक मलाच संधी देतील.     – सदाशिव लोखंडे, खासदार, शिवसेना