News Flash

देशहितापेक्षा भाजपला निवडणूक महत्त्वाची

ज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबतचा अशासकीय ठराव आपण सभागृहात मांडला.

देशहितापेक्षा भाजपला निवडणूक महत्त्वाची
राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे

विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

मुंबई : देशाचे हित आणि राज्यातील नागरिकांची सुरक्षा विचारात घेऊन विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास आम्ही सहमती दिली, परंतु सत्ताधारी भाजप निवडणुकीच्या तयारीत दंग आहे, त्यांना देशहितापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या वाटतात, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना आणि नोकरभरती करण्यात भाजप-शिवसेना सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. त्यानंतर विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी दुष्काळ, अंतरिम अर्थसंकल्पात विविध समाज घटकांची करण्यात आलेली उपेक्षा, नोकरभरती, धनगर आरक्षण इत्यादी प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, वंचित, उपेक्षित, दुर्बल, महिला, विद्यार्थी, युवक, व्यापारी, उद्योजक अशा कुठल्याही घटकाला न्याय मिळालेला नाही. अर्थसंकल्प वस्तुस्थितीशी विसंगत आहे. शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भातील आमच्या मागण्या, सूचना, शिफारशी आम्ही सभागृहाच्या पटलावर ठेवल्या आहेत. सरकारने त्यावर विचार करून अंमलबजावणी करावी आणि त्यासंदर्भात आम्हाला कळवावे, अशी मागणी आपण सभागृहात केल्याचे मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबतचा अशासकीय ठराव आपण सभागृहात मांडला. अधिवेशन चालू राहिले असते तर हा ठराव चर्चेला येऊन या समाजाला न्याय मिळण्यास मदत झाली असती. सरकारी भूमिका मात्र या सामाजिक प्रश्नावर प्रामाणिक नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.

राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी ठोस उपाययोजना आणि नोकरभरती करण्यास भाजप-शिवसेना सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

महाभरती करण्यात अपयश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांच्या महाभरतीची घोषणा करून आता एक वर्ष झाले. परंतु अजून एकाही बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात सरकार फसवणूक करीत असल्याचा मुद्दा आपण सभागृहात मांडल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:42 am

Web Title: election is more important than patriotism for bjp dhananjay munde
Next Stories
1 मराठा नेत्यांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित
2 सुरक्षेच्या मुद्दय़ांवरून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित
3 वेळेआधीच परीक्षा केंद्रावर पोहोचा ! आजपासून दहावीची परीक्षा सुरू
Just Now!
X