अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १७५ मतदारांची यादी तयार करतानाच मराठवाडा साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेला रविवारी वेग मिळाला. २० ऑक्टोबपर्यंत मतदारयादी अंतिम होईल आणि त्यानंतर निवडणुकीची तारीख आणि वेळ निश्चित केली जाणार आहे.
मराठवाडा साहित्य संमेलन या वर्षी उदगीर येथे घेण्यात यावे, असा प्रस्ताव आला होता. त्यावर चर्चा झाली. मात्र, त्या अनुषंगाने निर्णय झाला नाही. रविवारी डॉ. नांदापूरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक कौतिकराव ठाले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत २१ सदस्य हजर होते. कार्यकारिणीची निवडणूक घेण्यासाठी कार्यवाह कुंडलिक अतकरे यांनी मतदारांची यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करावी. जाहीर केलेल्या यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी १६ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. घेण्यात आलेल्या आक्षेपांची तपासणी १ ऑक्टोबपर्यंत करावी व १६ ऑक्टोबर रोजी अंतिम यादी निर्वाचन अधिकाऱ्याकडे द्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या आजीव सभासदांनी बदललेल्या पत्त्याची नोंद नव्याने करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.