News Flash

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

गेली तीन आठवडे सुरू असलेला लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा गदारोळ उद्या, मंगळवारी सायंकाळी पाचनंतर थंडावेल. समारोपासाठी प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आयोजित केल्या आहेत.

| April 14, 2014 04:19 am

गेली तीन आठवडे सुरू असलेला लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा गदारोळ उद्या, मंगळवारी सायंकाळी पाचनंतर थंडावेल. समारोपासाठी प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आयोजित केल्या आहेत. त्यानंतरचा गुरुवारी, मतदानापर्यंतचा कालावधी निवडणूक रिंगणातील उमेदवार त्यांच्या यंत्रणेसाठी ‘जागते रहो’चा ठरणार आहे. या कालावधीत मतदारसंघात फिरण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केवळ ६ वाहने वापरता येणारी आहेत.
जिल्हय़ात नगर व शिर्डी या दोन मतदारसंघांत लोकसभेच्या दोन जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातच प्रचाराचा काहीसा गदारोळ उडाला. तोही प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांमुळे. परंतु प्रचारातून दोन्ही मतदारसंघांतील प्रश्नांना बगलच मिळाली. वैयक्तिक आरोपप्रत्यारोप, टीकाटिप्पणी, अर्बन बँकेतील घोटाळे या भोवतीच प्रचार फिरत होता. उमेदवारांनी प्रचार फेऱ्या व गाठीभेटीवर भर दिला होता.
उमेदवार राजीव राजळे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर मतदारसंघ पिंजून काढला. दोघांनी जवळपास प्रत्येक तालुक्यात सभा घेतली. उमेदवार दिलीप गांधी यांच्या साऱ्या प्रचाराची भिस्त पक्षाचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांच्या सभेवरच होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवार दीपाली सय्यद व अपक्ष उमेदवार अ‍ॅड. बी. जी. कोळसे यांचा प्रचार ‘एकला चलो रे’ ठरला. गांधी व राजळे या दोघांनाही प्रचारात पक्षांतर्गत गटबाजीला तसेच मित्रपक्षांच्या नाराजीला तोंड देण्याची वेळ आली.
शिर्डीत काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सुरुवातीला पक्षांतराच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रचाराच्या रणात उतरावे लागले. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेने वाकचौरेंना दिलासा मिळाला असेल. सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली.
रविवारी सायंकाळपर्यंत आचारसंहिता भंगाच्या २२ तक्रारी दाखल झाल्या. भंगाबद्दल सहायक निवडणूक अधिकारी तथा कर्जत प्रांताधिकारी संदीप कोकडे यांना बदलीच्या कारवाईला तोंड द्यावे लागले. चार गुन्हेही दाखल करण्यात आले. उमेदवारांच्या खर्चाची तिसरी व अंतिम तपासणी मंगळवारी होणार आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवार, प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना एकूण ६ वाहने वापरता येणार आहेत. ज्याला जे वाहन मंजूर आहे, ते त्यालाच वापरता येणार आहे, इतरांना वापरता येणार नाही. गुरुवारी (दि. १७) सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ आहे. त्यासाठी मंगळवारी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मतदान संपल्यावर सर्व मतदान यंत्रे विधानसभा मतदारसंघात व तेथून नगरमधील वखार महामंडळाच्या गोदामात (एमआयडीसी) एकत्रित ठेवली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 4:19 am

Web Title: election promotion endend today
Next Stories
1 खाणीतील पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू
2 मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न
3 राष्ट्रवादीचे शिवाजी माने सेनेच्या प्रचाराला सक्रिय
Just Now!
X