पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची आघाडी निर्माण करण्यासाठी चर्चा सुरु होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे मोदी आणि भाजपासमोर विरोधकांकडून कोणते चेहरे असावेत यासंबंधीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जगनमोहन रेड्डी, कॅप्टन अमरिंगर सिंग, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी रणनीतीकार म्हणून काम केलं आहे.