नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर अहेरी उपविभागातील चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील ५६ ग्रामपंचायतींमध्ये उद्या, २४ एप्रिलला मतदान होत आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या १२ कंपन्या, राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच, गडचिरोली सी-६० दलाच्या १३ कंपन्या, अशा चार हजार सुरक्षा रक्षकांच्या कडक बंदोबस्तात ही निवडणूक होत आहे.
अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या नक्षलग्रस्त तालुक्यातील ७० ग्राम पंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. १४ ग्रामपंचायतीत नक्षलवाद्यांच्या भीतीने एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही, तर ५६ ग्राम पंचायतीत १ हजार ३०५ उमेदवार रिंगणात आहेत. अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीत ७२ प्रभागासाठी १८२ सदस्य निवडायचे आहेत. यासाठी ८३ मतदान केंद्रे असून ९० ईव्हीएम मशिन्स लावण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३७० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. अतिसंवेदनशील भागात आठ मतदान केंद्र आहेत. यात येलचिल, चिंतलपेठ, तिमरन, गुड्डीगुडम, मेडपल्ली, कोरेली, चंद्रा, गोविंदगावचा समावेश आहे. अहेरी, जिमलगट्टा, राजाराम, पेरमिली येथे चार बेस कॅम्पच्या माध्यमातून पोलिंग पाटर्य़ा पाठविण्यात आलेल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, उडेरा, गेदा, गुरूपल्ली, येमली, सोहगाव, जाराबंडी, बुर्गी व दिवडी या नऊ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक,  तर सिरोंचा तालुक्यात २४ ग्राम पंचायतींसाठी निवडणूक होत आहे, तर भामरागड येथे अवघ्या एका ग्राम पंचायतीत निवडणूक आहे. भामरागडमध्ये सहा ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत्या, पण इरकडुम्मे, नेलगुंडा, कुवाकोडी व परायनार या ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे एकाच ग्राम पंचायतीची निवडणूक घेतली जात आहे.
तालुक्याच्या ठिकाणी निवडणुकीचे थोडे वातावरण असले तरी ग्रामीण व अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात तेही नाही. नक्षलवाद्यांनी निवडणुकीत सहभागी व्हाल तर ठार करू, अशी धमकी दिल असल्यामुळे गावकरी निवडणुकीपासून दूर आहेत. अशाही स्थितीत लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता यावे, यासाठी चार हजार सुरक्षा रक्षकांचा बडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांना नक्षलवाद्यांनी दामरंचा येथे उपसरपंचाची गोळ्या घालून हत्या केली. या पाश्र्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील किती लोक मतदानासाठी मतदार केंद्रापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे, तर निवडणुकीत विध्वंस करण्याच्या दृष्टीने नक्षलवादीही तयार आहेत.