रस्तेखोदाईत तुटलेल्या भूमिगत विजेच्या तारांमधील प्रवाह जमिनीत उतरल्याने बालिकाश्रम रस्त्यावरील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. या विजेच्या धक्क्याने सोमवारी ऐन पोळय़ाच्या दिवशीच येथील एक गाय मृत्युमुखी पडली.
रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खोदला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम रेंगाळले असून ते आता जीवघेणे ठरू लागले आहे. पूर्वीचा रस्तचा खोदताना संबंधित ठेकेदाराने काही ठिकाणी भूमिगत विजेच्या तारा टाकल्या असून गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या भूमिगत तारांमधील विजेचा प्रवाह सोमवारी सकाळी येथे साचलेल्या पावसाच्या पाण्यात उतरला. त्याचा धक्का बसून बाबासाहेब सुडके यांची गाय ऐन पोळय़ाच्या दिवशीच दगावल्याने परिसरात कमालीचा संताप व्यक्त होत असून येथे साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांमध्येही कमालीची भीती निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी गाय दगावल्यानंतर नागरिकांनी महावितरण कंपनी व तोफखाना पोलिसांनाही तातडीने ही घटना कळवली. मात्र या दोन्ही यंत्रणांनी या गंभीर प्रकाराबाबतही गंभीर ढिलाई दाखवली. महावितरण कंपनीला वारंवार दूरध्वनी करूनही सुमारे दोन तास येते कोणीच फिरकले नाही, त्यामुळे जमिनीत उतरलेला विजेचा प्रवाह तसाच सुरू होता. अखेर नागरिकांनी आमदार अनिल राठोड यांना कळवले. त्यांनी तातडीने येथे धाव घेत घटनेची पाहणी केली व या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावल्यानंतर येते महावितरणचे कर्मचारी पोहोचले. सुमारे दोन तासांनंतर या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला.