विजेची तूट असली तरीही महावितरणचा सक्षमतेचा दावा
राज्यात सध्या केवळ ५०० ते ६०० मेगाव्ॉट विजेची तूट असून ती भरून काढण्यासाठी महावितरण सक्षम असल्याचा दावा महावितरणने केला आहे. वीज दरवाढीमुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला असून त्याबद्दल मात्र महावितरण बोलायला तयार नाही. रविवारी २९ डिसेंबरला महाराष्ट्रात १५ हजार ६६५ मेगाव्ॉट विजेची मागणी नोंदवली गेली. महावितरणने १५ हजार ५६ मेगाव्ॉट विजेचा पुरवठा केला. संपूर्ण डिसेंबरमध्ये एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता महावितरणच्या यंत्रणेत १५ हजार ते १५ हजार ७०० मेगाव्ॉटपर्यंत विजेची मागणी सातत्याने नोंदवली जात आहे. १४ हजार ७५० ते १५ हजार मेगाव्ॉट विजेचा नियमितपणे पुरवठा सुरू आहे. ५०० ते ६०० मेगाव्ॉट तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महावितरण सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरी १४ हजार ४०० मेगाव्ॉट विजेची मागणी होती आणि उपलब्धता सरासरी १३ हजार ७०० मेगाव्ॉटच्या आसपास होती.
राज्यात सुमारे सव्वादोन कोटी वीज ग्राहक आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला असून विजेची मागणी सुमारे दीड हजार मेगाव्ॉटने वाढली आहे. महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रातून ४ हजार ५०० ते ५ हजार मेगाव्ॉट, जलविद्युत केंद्रातून १ हजार ४०० ते १ हजार ८०० मेगाव्ॉट, वायू प्रकल्पातून २७५ ते ३०० मेगाव्ॉट वीज उपलब्ध होते. केंद्रीय प्रकल्पातून ४ हजार ७०० ते ५ हजार ५०० मेगाव्ॉट, तर खाजगी प्रकल्पातून २ हजार ५०० ते २ हजार ७०० मेगाव्ॉट वीज उपलब्ध होते. ज्या भागात नियमितपणे विजेची बिले भरली जात नाहीत त्याच भागात हेतूत: भारनियमन केले जाते. त्यामुळे राज्यात भारनियमनमुक्त करणे शक्य आहे. सध्या असलेली विजेची तूट भरून काढण्यासाठी महावितरण सक्षम असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
विजेची सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रत्येक महिन्यात वीज कमी वापरली तरी बिले मात्र आधीच्या महिन्याच्या तुलनेत जास्तच येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत, याबद्दल मात्र महावितरण बोलायला तयार नाही.