पथदर्शक प्रकल्पाचे आज राळेगणसिद्धीत भूमिपूजन

राज्यभरातील कृषीपंपांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आव्हान पेलताना सरकारची दमछाक होते. त्यात वीजबिले थकण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हे आव्हानही असतेच. या परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसभर बारा तास सलग वीज पुरविण्यासाठी नवा अभिनव ‘सौर-मंत्र’ दुमदुमणार आहे. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे शनिवारी दोन मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात असून राज्यातील ही पहिलीच ‘सौर कृषीवाहिनी योजना’ इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरणार आहे.

महानिर्मिती आणि मुंबई येथील ‘संगम एनर्जी अ‍ॅडव्हायजर’ ही कंपनी यांच्यावतीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा,’ या पद्धतीने सहभागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथून नारायण गव्हाण वीजउपकेंद्रापर्यंत सौर वीजवाहिनी उभारून वीज नेली जाईल. परिसरातील शेतीपंपांना त्याद्वारे दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात येईल. या प्रकल्पात सौरपॅनेल उभारण्यासाठी घेतलेली जागा टेकडीवर असून पिकांखालील क्षेत्र वापरले जाणार नाही. फेब्रुवारी अखेपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

राज्यातील एकूण वीजवापराच्या ३० टक्के वीज ही शेतीसाठी वापरली जाते. पण पावसाळ्यानंतर विहिरीचे पाणी वाढून विजेची मागणी वाढते. त्यामुळे रोहित्रांवर अतिरिक्त दाब येतो. रोहित्र जळण्याचे आणि बिघडण्याचे प्रमाण वाढते. त्यात ग्रामीण भागात १२ तास भारनियमन केले जाते. महिन्यातील १४ दिवस तर शेतीपंपांना केवळ रात्रीच वीजपुरवठा केला जातो. या सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री या योजनेसाठी आग्रही होते, अशी माहिती महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता आर. बी. चव्हाण यांनी दिली. तर या योजनेची सुरुवात नगर जिल्ह्यातून होत आहे, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची असल्याचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या भूमिपूजनास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री राम िशदे, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी आदी उपस्थित राहणार आहेत.

अण्णा आणि मुख्यमंत्री एकत्र!

  • भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असून अण्णा हजारे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत हजारे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात दोघेही नेमके काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

आकडेमोड..

  • दोन मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी साडेतीन हेक्टरची जागा शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
  • प्रकल्प उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा खर्च. प्रतियुनिट २ रुपये ९४ पैसे दराने वीजपुरवठा.
  • जमिनीचे भाडे आणि वीजवाहिनी यासाठी महानिर्मिती ७० लाखांचा खर्च करणार.

शेतीपंपाला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने रोहित्र जळतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळ जातो. रात्री सर्पदंश आणि बिबटय़ाचे हल्ले, हे धोके असल्याने पिकांना पाणी देणे धोकादायक बनले आहे. आता सौर कृषीवाहिनीमुळे शेतकऱ्यांची समस्या दूर होईल.

लाभेश औटी, उपसरपंच, राळेगणसिद्धी