कराडमधील मांस विक्री तसेच मासे विक्री दुकाने व उपाहागृहांमधील दरुगधी पसरवणाऱ्या टाकाऊ ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून  ६०० युनिट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तर, नगराध्यक्षा संगीता देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह पालिकेतील सर्व पदाधिकारी अधिकारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रतिदिनी ५ मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या सदर प्रकल्पाचे मुंबईचे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र तांत्रिक सल्लागार आहेत. मुंबईचीच मेसर्स अविप्लास्ट ही ठेकेदार कंपनी आहे. प्रकल्प उभारणीस जिल्हाधिकारी सातारा यांनी १३ ऑक्टोंबर २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पासाठी सुमारे ९५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, वित्तीय आकृतिबंधानुसार ८० टक्के म्हणजेच ७६ लाखांचे शासकीय अनुदान असून, २० टक्के म्हणजेच १९ लाखांचा नगरपरिषद स्वहिस्सा राहणार आहे.