|| दयानंद लिपारे

खंडित वीजपुरवठा सुरळित करण्याचे अथक कार्य पूर्ण

महापुरापाठोपाठ वीजपुरवठय़ाअभावी  अंधारलेल्या सांगली, कोल्हापूर शहर आणि परिसराला काळोखातून बाहेर काढण्याचे काम महावितरणच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या गेले आठ दिवस सुरू असलेल्या अथक प्रयत्नातून आज पूर्ण झाले. आज संध्याकाळी या दोन्ही शहरांबरोबरच परिसरही पुन्हा एकदा प्रकाशमान झाला आणि पुराच्या मिट्ट काळोखातून बाहेर पडल्याचे भान नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले.

सांगली -कोल्हापुरातील महापुराचा तडाखा या शहरांबरोबरच ‘महावितरण’लाही मोठय़ा प्रमाणात बसला. या महापुराने ‘महावितरण’चे तब्बल ११६ कोटीचे नुकसान केले. महापुरापाठोपाठ ही दोन्ही शहरे आणि परिसर अंधारात बुडाला. पूर ओसरताच महावितरणने हा अंधार दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले होते. गेले आठ दिवस स्थानिक आणि बाहेरची यंत्रणा, कर्मचारी, साहित्य मागवत सुरू असलेल्या या अथक प्रयत्नातून हे काम आज पूर्ण झाले.

सांगली -कोल्हापुरातील महापुरात महावितरणच्या यंत्रणेलाही जबर फटका बसला. विजेचे खांब, तारा, रोहित्र, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाल्याने अतोनात नुकसान झाले. महापुरात एखाद्या झाडाची फांदी वाहून आली आणि तिने विजेचे खांब, तारा, रोहित्र, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या अशा साहित्यांची पार नासधूस केली, असे प्रकार जागोजागी घडले.

टीकेचा महापूर

आधीच महावितरणच्या कारभाराबद्दल बरे बोल ऐकू येण्याचे प्रसंग तसे कमीच. त्यात महापुराच्या आपत्तीत पूर्ण आठवडा कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी  सारखी व्यापार उदिमात अग्रेसर असलेली शहरे आणि शेकडो खेडी विजेविना, वीज खंडित झाल्याने,अपुऱ्या दाबाने अशा नाना कारणांनी अंधकारमय झालेली. परिणामी महावितरणच्या अंधाऱ्या कारभारावर ताशेरे ओढण्याचे काम सुरू झाले. आधीच आपली यंत्रणा सावरताना महावितरणचे त्राण  हरपलेले, वरून लोकांचा रोष. यामुळे वीज पुरवठा करणारी यंत्रणा पुरती हतबल झाली होती. मात्र,आस्मानी आपत्तीला सामोरे जाऊन काही तरी भरभक्कम घडवून आणण्याची आणि आपली कूर्मगती कारभाराची प्रतिमा पुसण्याची हीच वेळ आहे हे ओळखून महावितरणची एकूणच यंत्रणा कंबर कसून महापुरात झोकून देऊन उतरली.

शहर उजळण्याचे आव्हान पेलताना

निर्धार आणि संकल्प यात किती महद  अंतर आहे याचा अनुभव महावितरणचे तिन्ही जिल्ह्यतील अधिकारी, कर्मचारी गेला पूर्ण आठवडा घेत आहेत. या भागातील मनुष्यबळ कमी पडत असल्याने बाहेरून कुमक मागवली. महापुरामुळे दोन जिल्ह्यंतील ३ लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. पाणीपातळी  कमी होईल तसा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला. राज्यभरातून साहित्य घेऊन ट्रक कोल्हापूर—सांगलीच्या दिशेने मार्गस्थ झाले. महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीच्या मदतीला धावून वीजपुरवठा सुरळीत करू लागले. महापुरात झोकून देऊन रिले बोटीच्या साह्यने कामाला सुरुवात केली. वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केल्याने युद्धस्तरावर यंत्रणा गतिमान झाली. सप्ताहभर सारी यंत्रणा झपाटून कामाला लागल्याने कोल्हापूर शहरातील ९९ टक्के तर सांगली शहरातील ९८ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. ग्रामीण भागातीलही ९०  टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, असा दावा महावितरणने केला आहे. पूरग्रस्त भागात वीजग्राहकांना जागेवर वीजसेवा देण्यासाठी महावितरणने ‘आपतकालिन ग्राहक सहाय्यता केंद्रे’ सुरू केली असून, कोल्हापूर व सांगली शहरात अशी सहा केंद्रे सुरू करण्यात आली.

शहर उजळताना तारा निखळला

वीज नसल्याने दिवस सरतील तसा लोकांचा महावितरणावरील रोष वाढत गेला. दबावापुढे झुकत काम करीत राहणे भाग पडले. त्यातून सांगली जिल्ह्यत एके ठिकाणी महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. तर,कोल्हापूर जिल्ह्यत कर्तव्य निभावताना एक कर्मचारी जखमी झाला आहे. बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक छावणीच उघडण्यात आली. ३०० हून अधिक लोक येथे निवास करीत होते. प्राणाची बाजी लावून महावितरणच्या पथकाने काम केल्याने काही ग्रामपंचायती, संस्था यांनी पत्राद्वारे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

वीजदेयक भरण्यास मुदतवाढ 

महावितरणला कोल्हापूर जिल्ह्यत ४९ कोटी तर सांगलीत ४७ कोटी असे ११६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा हजारांवर रोहित्रांना त्याचा फटका बसला आहे. अशाही स्थितीत पुरामुळे अनेकांना वीज देयक  भरता न आल्याने पूरग्रस्त भागातील लघुदाब ग्राहकांना महिना तर उच्चदाब ग्राहकांना वीजदेयक भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देऊन महावितरणने दिलासा दिला आहे, असे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सांगितले .