सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जंगली हत्ती मृत्युमुखी पडल्याची संख्या आतापर्यंत सहा झाली आहे. महाराष्ट्राच्या जंगलात हत्ती नव्हते, पण कर्नाटकातून आलेले जंगली हत्ती मात्र महाराष्ट्र वनविभागाला सांभाळता आले नाही. त्याची काळजीही घेता आली नाही, त्यामुळे पर्यावरणप्रेमीत नाराजी आहे.
कर्नाटक दांडेली अभयारण्यातून जंगली हत्ती सिंधुदुर्गात गेली १५ वर्षे येत आहेत. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात तीन हत्तींचा तर कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात तीन हत्तींचा कळपाचा वावर होता. माणगाव खोऱ्यातील हत्तींनी जीवित व वित्त हानी केल्याने फेब्रुवारीमध्ये कर्नाटकातील डॉ. उमाशंकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने पकडले.
चंदगडमध्ये हत्तींचा वावर आहे. ते हत्ती आजही आंबोली, चौकुळ, तिलारी भागात रोज जात असतात. मात्र माणगाव खोऱ्यात पकडलेले तीन हत्ती आंबेरीत ठेवण्यात आले होते. या हत्तींना पकडल्यापासून ते क्रॉलमध्ये होते. प्रथम गणेश व शुक्रवारी समर्थने देह ठेवला. आता मित्र मागे राहिला असून मेळघाटमधील सोबतीण लक्ष्मी त्याच्या सोबत आहे.
समर्थ हत्तीच्या पायाला जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आहे या हत्तींना निवासस्थानासाठी एलिफंट होम प्रकल्प फक्त चर्चेत राहिला. बेसुमार वृक्षतोड करणाऱ्या महाराष्ट्राच्या वनखात्याला हत्तींच्या रूपाने लाभलेले वैभव टिकविता आले नाही. असे पर्यावरणप्रेमीत बोलले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आतापर्यंत सहा हत्तींचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या वनखात्याला हत्तींचा सांभाळ करता आला नाही. राज्यात हत्ती सांभाळण्यासाठी वनखात्याकडे प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याने कर्नाटकातून कर्मचारी आणावे लागले. या ठिकाणी राज्याच्या वनखात्याचे दिवाळे उडाले असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या वनखात्याने फेब्रुवारीपासून चार महिने होत आले तरी पकडलेल्या हत्तींचे निवासस्थान प्रकल्प निश्चित केलेला नाही. राज्याच्या युती शासनाच्या भांडणात हत्तींची निगा व सेवा देणारा प्रकल्पही बांधता आला नाही.